Saturday, 25 Sep, 6.53 pm प्रभात

मुखपृष्ठ
मोदींनी बायडेन यांच्याशी झालेल्या चर्चेत उपस्थित केला एच 1 बी व्हिसाचा विषय

वॉशिंग्टन - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष बायडेन यांच्याबरोबर झालेल्या चर्चेत अन्य अनेक महत्वाच्या विषयांबरोबरच एच 1 बी व्हिसाचा विषयही उपस्थित केला. भारताचे विदेश सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना ही माहिती दिली.

एच 1 बी व्हिसा हा भारतीय तंत्रज्ञांसाठीचा जिव्हाळ्याचा विषय आहे. त्या व्हिसा आधारे त्यांना अमेरिकेत जाऊन काम करण्याची संधी मिळत असते. अमेरिकन कंपन्याही भारत आणि चीन मधून असे प्रशिक्षित तंत्रज्ञ आपल्या कंपन्यांमध्ये नोकरीला ठेऊ इच्छितात.

त्यातून हजारो भारतीयांना अमेरिकेत नोकरी करण्याची संधी उपलब्ध होत असते. पण गेल्या काही वर्षांपासून अमेरिकेने या व्हिसावर निर्बंध आणल्याने भारतीय युवकांची मोठीच कुचंबणा झाली आहे. अमेरिकेत काम करणारे भारतीय व्यावसायिक अमेरिकेतील सामाजिक सुरक्षा क्षेत्रासाठी मोठ्या प्रमाणावर योगदान देत असतात ही बाबही मोदी यांनी बायडेन यांच्या निदर्शनाला आणून दिली.

दरम्यान व्हाईट हाऊसनेही भारतीयांना दिल्या जात असलेल्या व्हिसाच्या संबंधात काही आकडेवारी प्रसिद्धीला दिली असून त्यात त्यांनी म्हटले आहे की, यावर्षी आत्तापर्यंत 60 हजार भारतीय विद्यार्थ्यांना अमेरिकेत शिक्षणासाठीचे व्हिसा जारी केले गेले आहेत. सध्या अमेरिकेत सुमारे दोन लाख भारतीय विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यांच्याकडून अमेरिकन अर्थव्यवस्थेला दरवर्षी सुमारे 7.7 अब्ज डॉलर्सचे योगदान दिले जाते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top