Dailyhunt
MPSC Result 2024 : राज्य सेवा परीक्षेचा निकाल जाहीर! सोलापूरचा विजय लामका राज्यात प्रथम; आरती जाधव महिलांमधून अव्वल

MPSC Result 2024 : राज्य सेवा परीक्षेचा निकाल जाहीर! सोलापूरचा विजय लामका राज्यात प्रथम; आरती जाधव महिलांमधून अव्वल

MPSC Result 2024 - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या राज्य सेवा मुख्य परीक्षा-२०२४ चा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेत सोलापूर जिल्ह्याने बाजी मारली आहे. सोलापूर येथील विजय नागनाथ लामकाने याने सर्वसाधारण, तसेच मागासवर्गीय गटातून राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

महिलांमधून सोलापूरच्याच आरती परमेश्वर जाधव या राज्यात प्रथम आल्या आहेत. या निकालामुळे राज्यातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

महाराष्ट्र लोकसेवा अयोगातर्फे २७ ते २९ मे २०२५ या कालावधीत घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल बुधवारी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यानुसार विविध २० संवर्गांतील एकूण ४६१ पदांवर उमेदवारांची शिफारस करण्यात येत असल्याचे आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. आयोगाने उमेदवारांच्या माहितीसाठी अंतिम निकालासोबतच प्रत्येक प्रवर्गासाठी शिफारसपात्र ठरलेल्या शेवटच्या उमेदवाराचे गुण (कट-ऑफ) अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केले.

या माध्यमातून उमेदवारांना स्वतःची कामगिरी आणि स्पर्धेची पातळी समजण्यास नक्कीच मदत होणार आहे. अंतिम निकालाद्वारे शिफारस करण्यात आलेल्या उमेदवारांची नियुक्ती ही त्यांच्या आवेदनपत्रातील माहिती आणि दाव्यांच्या पडताळणीवर आधारित असेल. नियुक्तीच्या वेळी मूळ प्रमाणपत्रांची तपासणी केली जाईल. कोणतीही माहिती खोटी किंवा अपूर्ण आढळली, तर संबंधित उमेदवाराची उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाणार आहे, असे आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

हा निकाल विविध न्यायालयीन प्रकरणांतील अंतिम निर्णयाच्या अधीन राहून जाहीर करण्यात आला आहे. विशेषतः मुंबई उच्च न्यायालय येथे दाखल रिट याचिका संदर्भात दिलेल्या आदेशानुसार काही उमेदवारांचा निकालात समावेश करण्यात आला आहे. मात्र, प्रशासकीय कारणास्तव त्यांची शिफारस सध्या राखून ठेवण्यात आली आहे. दिव्यांग, अनाथ, खेळाडू आणि मागासवर्गीय प्रवर्गासाठी आरक्षित पदांवरील उमेदवारांची शिफारस सक्षम प्राधिकरणाच्या पडताळणीच्या आधीन राहणार आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat