Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Mukesh Khanna : "घोषणाबाजी करायची आणि रात्री पार्ट्या करायच्या हे खऱ्या विद्यार्थ्यांचं लक्षण नाही"; मुकेश खन्ना सीजेपीवर संतापले

Mukesh Khanna : "घोषणाबाजी करायची आणि रात्री पार्ट्या करायच्या हे खऱ्या विद्यार्थ्यांचं लक्षण नाही"; मुकेश खन्ना सीजेपीवर संतापले

प्रभात 2 weeks ago

Mukesh Khanna : अभिनेत्री आणि भाजप महिला खासदार कंगना राणौत यांनी कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनावर टीका केली होती. कंगना यांनी जेन झींना 'गटर छाप' म्हणताच त्यावर अनेक प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या.

यानंतर आता ज्येष्ठ अभिनेते मुकेश खन्ना यांनी देखील जंतरमंतरवरील आंदोलन केलेल्या विद्यार्थ्यांवर संताप व्यक्त आहे. काही आंदोलकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मातोश्रींबद्दल वापरलेल्या आक्षेपार्ह आणि असभ्य भाषेवर मुकेश खन्ना यांनी टीका केली.

सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत मुकेश खन्ना म्हणाले की, “मी सध्या भारताबाहेर आहे. पण भारतात काय सुरु आहे याकडे माझं लक्ष आहे. दोन दिवसांपूर्वी देखील मी एक व्हिडीओ पोस्ट केलेला, ज्यामध्ये मी जेन झींबद्दल चिंता व्यक्त केली होती. जर हे आपले जेन झी आहे तर येणाऱ्या 25 वर्षांत आपला देश यांच्या खांद्यावर असणार आहे, त्यामुळे तुम्ही समजून घ्या आपल्या देशाचे काय हाल होणार आहेत. तरीही, या मुद्द्याबाबत मी जे पाहिलं आणि लोकांकडून जे ऐकलं आहे, त्यावरून मला असं वाटतं की बहुसंख्य लोकांचं असं मत आहे की हे आपल्या देशाचे खरे विद्यार्थी नाहीत. NEET किंवा पेपरफुटीसारख्या मुद्द्यांवर आंदोलन करणारे हे विद्यार्थी नाहीत.'

पुढे ते म्हणाले, “NEET परीक्षा किंवा पेपर फुटीच्या मुद्द्यावरून आंदोलन करणाऱ्या खऱ्या विद्यार्थ्यांबद्दल मला सहानुभूती आहे. पण आंदोलनाच्या नावाखाली पंतप्रधान आणि त्यांच्या दिवंगत मातोश्रींबद्दल ज्या प्रकारे अत्यंत नीच आणि गलिच्छ भाषेचा वापर करण्यात आला, ते पाहून माझे मन हेलावलं आहे. हे लोक सरकार पाडण्याचा मोठा हेतू घेऊन पुढे आले आहेत. हे विद्यार्थी प्रतिनिधित्व करु शकत नाही. मला असं वाटतं हे झुरळांप्रमाणे आहेत, जसं की घरात झुरळ येतात आणि आपण त्यांना बाहेर काढून टाकतो. त्याचप्रमाणे, जे लोक कॅमेऱ्यासमोर येतात आणि अशी घाणेरडी भाषा वापरतात, त्यांनाही हटवलं पाहिजे आणि दूर ठेवलं पाहिजे.

मुकेश खन्ना पुढे म्हणाले, “माझ्या मते, खऱ्या अर्थाने हे आंदोलन नीटशी संबंधित नव्हतंच किंवा ती विद्यार्थ्यांचं आंदोलन देखील नव्हतं. हे आंदोलन उत्स्फूर्त नसून पूर्णपणे नियोजीत होतं आणि यामागे मोठे राजकीय हेतू होते. हे लोक सरकार पाडण्याचे मनसुबे घेऊन आले होते. दिवसभर घोषणाबाजी करायची, शिवीगाळ करायची आणि रात्री पार्ट्या करायच्या, हे खऱ्या विद्यार्थ्यांचं लक्षण असू शकत नाही. पैशांसाठी देशात अस्थिरता निर्माण करू पाहणाऱ्यांचा हा कट आहे. हे एक एक स्पॉन्सर्ड आंदोलन होतं, ज्यासाठी प्रचंड आर्थिक पाठिंबा देण्यात आलेला. मला असं वाटतं की, यात सहभागी असलेल्यांपैकी काही जण केवळ थोड्याशा पैशांसाठी देशाला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहेत.”

पुढे त्यांनी इशारा देत सांगितले की, “मला त्या मुलांना असं देखील सांगायचं आहे की, कॅमेऱ्यासमोर तुम्ही जे काही बोललात किंवा केलं आहे, त्याचा तुमच्या भविष्यातील आयुष्यावर कसा परिणाम होऊ शकतो, याची कदाचित तुम्हाला अजून जाणीव नसेल. अशा लोकांच्या नादी लागून कॅमेऱ्यासमोर केलेली ही वर्तणूक इतिहासात नोंदवली गेली आहे. अशा लोकांपासून दूर राहा, ते केवळ तुमचा वापर करून घेतील आणि नंतर तुम्हाला वाऱ्यावर सोडून देतील. अन्यथा, तुम्हाला प्रत्येक टप्प्यावर अडचणींचा सामना करावा लागू शकतो. कदाचित नोकरी मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागेल किंवा नंतर तुमच्या करिअरवर त्याचे विपरीत परिणाम भोगावे लागतील. त्यामुळे, आपल्या भविष्याचा विचार करा आणि विचारपूर्वक निर्णय घ्या', असं देखील मुकेश खन्ना विद्यार्थ्यांना म्हणाले आहेत.

“देशातील कोणत्याही आई-वडिलांनी आपल्या मुलांकडून पंतप्रधानांना अशा शिव्या देताना ऐकलं, तर त्यांची मान शरमेनं खाली झुकल्याशिवाय राहणार नाही. अशा संगतीत राहून तुम्ही स्वतःचं आयुष्य खराब करत आहात. अशा लोकांच्या जाळ्यातून लवकरात लवकर बाहेर पडा,” असं आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केलं.

TOP 10 News: व्यावसायिक एलपीजी सिलेंडर स्वस्त ते अमित शहा आज पुणे दौऱ्यावर; जाणून घ्या Top 10 News…

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat