Thursday, 22 Jul, 3.37 pm प्रभात

मुखपृष्ठ
मुळशी तालुक्‍यात दमदार पाऊस; मुळा-वळकी नदीला पूर

पौड - मुळशी तालुक्‍यात रात्रीपासून सर्वत्र मुसळधार पावसाने दमदार हजेरी लावली असून, मुळशी धरण पाणलोट क्षेत्रात ढगफुटी सदृश्‍य पाऊस झाला आहे. पावसामुळे मुळा, वळकी नदीला पूर आला आहे. जवळपास सर्वच ओढे नाले दुथडी भरून वाहत आहे. मुसळधार पावसामुळे तालुक्‍यातील जवळजवळ सगळेच रस्ते पाण्याखाली गेले होते.

पौड येथे डोंगरातून वाहून आलेल्या पाण्यामुळे पौड पंचायत समिती समोरील रस्ता पाण्याखाली गेला होता, तर पौड ग्रामपंचायतीसमोर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. दारवली-अंबडवेट दरम्यान असलेल्या पुलावरूनही मोठ्या प्रमाणत पाणी वाहत होते. सुतारवाडी घाट, पिरंगुट घाटात रस्त्यावर मोठी दगडी वाहून आली, परिणामी वाहनचालकांना कसरत करावी लागत होती.

मुठा व मोसे खोऱ्यातही दमदार पाऊस पडत आहे, त्यामुळे सर्व ओढे-नाले तुडुंब भरून वाहत आहे. वेगरे गावामध्ये काल रात्रीपासून जोरदार पाऊस झाल्यामुळे ढगफुटी सदृश्‍य परिस्थिती जाणवली, यामुळे वेगरे ग्रामस्थांसाठी दळणवळणासाठी असणारा एकमेव लव्हार्डे ते वेगरे रस्त्यावरील मोरी वाहून गेली आहे.

मुख्य रस्त्यावरील मोरी वाहून गेल्याने वेगरे गावचा संपर्क तुटला असून ग्रामस्थांचे दळणवळण बंद झाले आहे. अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या असून शेतीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. कोळवण विभाग परिसरात वाळेन गावामध्ये शेतकऱ्यांचे लावलेले भात वाहून गेले असून, शेताचे बांध फुटले आहेत, मांदेडे, बेलावडे परिसर, तसेच भादस, रिहे , मुठा खोरे, दासवे, वेगरे या भागातही मोठा पाऊस झाला आहे.

'मुळा नदीला मुळशी धरणाचे पाणी सोडलेले नसताना सुद्धा पुराचे स्वरूप आले आह, तसचे वळकी नदी काठोकाठ भरलेली असून, करमोळी येथे दोनीही नद्यांचा संगम होत असल्याने नदी काठोकाठ भरून वाहत आहे, तरी नदी शेजारील गावांना सतर्क राहावे.'
-अमोल धनवे तालुका उपाध्यक्ष, भाजप

'ताम्हिणी परिसरात गेल्या 24 तासात 468 मि. मी. एवढ्या पावसाची नोंद झाली. अद्यापही पावसाची संततधार सुरू आहे. धरण जलाशय पातळीत 7 फूटाने वाढ झाली असून,गेल्या 24 तासांत ऐतिहासिक अशा 73 दलघमी (म्हणजेच 2.60 अघफू/टिएमसी) नोंद झाली असल्याची माहिती'
- बसवराज मुन्नोळी, टाटा धरण प्रमुख

'सर्व स्थानिक तथा ग्रामपंचायत स्तरावरील अधिकारी यांना गावामध्ये हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत त्याचप्रमाणे झालेल्या नुकसानीचा अंदाज घेण्यासाठी सांगण्यात आले. आहे'
- अभय चव्हाण, तहसीलदार, मुळशी

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top