Monday, 30 Mar, 5.03 am प्रभात

मुख्य बातम्या
मुंबई-पुण्यावरुन येणाऱ्यांना सक्तीने संस्थात्मक अलगीकरण केंद्रात ठेवणार

कोल्हापूर (प्रतिनिधी) - मुंबई-पुण्यावरुन जिल्ह्यात येणाऱ्या सर्व प्रवाशांना सक्तीने संस्थात्मक अलगीकरण केंद्रात ठेवले जाईल. कोणत्याही परिस्थितीत त्यांना घरी सोडले जाणार नाही. त्यामुळे जिल्ह्यात येण्याचा प्रयत्न करु नये. जेथे आहात तेथेच घरी सुरक्षित रहा, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले. दुधाचे टॅंकर, रुग्णवाहिका इतर जीवनावश्‍यक वस्तुंची वाहतूक करणाऱ्या वाहनामधून व्यक्तींची वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशाराही त्यांनी दिला.

सतेज पाटील म्हणाले, वर्तमानपत्रे सुरु करण्याचा निर्णय सर्व संपादकांनी घेतलेला आहे. वर्तमानपत्रे वितरण करणाऱ्याला मास्क, ग्लोव्हज आणि सॅनिटायझर द्यावे. जेणेकरुन जे वर्तमानपत्र घरामध्ये जाणार आहे ते व्यवस्थित आहे याचा विश्वास वाचकांवर बसला पाहिजे. अशा सर्व सुविधा देण्याचे संपादकांनी मान्य केले आहे. तशी कोणतीही तक्रार येवू नये याची दक्षता त्यांनी घ्यावी.

इचलकरंजी येथील निरामय आणि अलायन्स हे हॉस्पिटल अधिग्रहीत केली आहेत. त्याच बरोबर गडहिंग्लजमधील केदारी रेडेकर हॉस्पिटल स्वत:हून आमच्या ताब्यात दिले आहे. पारगावचे वारणा हॉस्पिटल त्यांनीही परवानगीचे पत्र दिले आहे. जिल्ह्यामध्ये दुर्देवाने वेळ आली तर सगळ्या दृष्टीने तयारी आहे, असेही पालकमंत्री म्हणाले.

सव्वा कोटीचे व्हेंटीलेटर
जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून सव्वा कोटी रुपयांचे व्हेटीलेटर्स विकत घेतले आहेत. मास्क, ग्लोव्हज आवश्‍यक त्या सर्व सुविधा कमी पडणार नाहीत यासाठी आमचा प्रयत्न सुरु आहे. आपण फक्त घरात राहून आम्हाला सहकार्य करावे, अशी विनंती सतेज पाटील यांनी केली. प्रत्येक जिल्ह्यामध्ये करोनासाठी 100 खाटांची सुविधा असली पाहिजे, असा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. तसेच ज्यांना होम क्वॉरंटाईन सांगितले आहे त्यांनी घरातून बाहेर पडू नये. आजपर्यंत 600 मोटर सायकली जप्त करण्यात आल्या आहेत. गरज नसेल तर कृपा करुन घरातून बाहेर पडू नका, असे आवाहनही त्यांनी केले.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top