Wednesday, 11 Mar, 8.45 am प्रभात

मुखपृष्ठ
नागरिकत्व विधेयकाबाबत कॉंग्रेस मुस्लिमांना भडकवत आहे : आठवले

महाबळेश्‍वर - नागरिकत्व कायद्द्यावरून कॉग्रेस हेत पुरस्सर मुस्लिम समाजात गैरसमज पसरवून आपली राजकीय पोळी भाजत आहे, असा आरोप केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला. या विधेयकामुळे देशातील कोणाचेही नागरिकत्व जाणार नाही, तर उलट नागरिकत्व मिळवून देणारा हा कायदा आहे, अशा शब्दात आठवले यांनी नागरिकत्व विधेयकाचे समर्थन केले.

ना. रामदास आठवले कुटुंबीयांसोबत महाबळेश्‍वर येथे दोन दिवसांच्या विश्रांतीसाठी आले होते. त्यांनी काही पर्यटनस्थळांना भेटी देऊन निसर्गसौंदर्याचा आनंद लुटला. सायंकाळी पत्नीसोबत महाबळेश्‍वरच्या बाजारपेठेत हस्तकलेचा उत्तम नमुना म्हणून प्रसिध्द असलेल्या चप्पल खरेदीचा आनंद घेतला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाप्रमुख अशोक गायकवाड उपस्थित होते.

राज्यातील आघाडी सरकारबाबत ते म्हणाले, ''सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेनेबरोबर कॉग्रेस कधीच जाणार नाही, या भ्रमात भाजपचे नेते राहिल्यामुळे भाजपचे नुकसान झाले. शिवसेनेला दोन वर्षे मुख्यमंत्रिपद देण्याची मी मागणी केली होती. परंतु, शिवसेनेला मुख्यमंत्रिपद देण्यास केंद्रीय नेतृत्वही तयार नव्हते.' या तीन पक्षांत अनेक विषयांवर मतभेद आहेत. त्यामुळे कोणत्याही क्षणी शिवसेना- भाजप युती पुन्हा सत्तेवर येऊ शकते, असे भाकितही आठवले यांनी केले. 'सीएए'वरून मुस्लिम समाजात गैरसमज पसरविले जात आहेत, त्याचप्रमाणे संविधानावरून दलितांमध्ये गैरसमज पसरविले जात आहेत. मोदी हे डॉ. बाबासाहेबांच्या संविधानाचा आदर करणारे आहेत.

परंतु, मोदी संविधान बदलणार अशी वक्‍तवे करून कॉग्रेस मोदींची बदनामी करत असल्याचा आरोप आठवले यांनी केला. दिल्ली दंगलीस कॉग्रेसच जबाबदार असल्याचा आरोपही आठवले यांनी केला. शाहीनबाग दंगेखोरांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करूनही दंगल भाजप व आरएसएसने घडविली, असा प्रकाश आंबेडकरांचा आरोप चुकीचा आहे. प्रकाश आंबेडकरांनी वंचित आघाडीचा केलेला प्रयोग चांगला असला तरी अशा प्रयोगामुळे निवडणूक जिंकणे शक्‍य नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top