Dailyhunt
Nana Patole : पार्थ पवार यांच्या 'डाऊनफॉल' विधानावर नाना पटोलेंची एकाच वाक्यात प्रतिक्रिया; विषयचं संपवला म्हणाले.

Nana Patole : पार्थ पवार यांच्या 'डाऊनफॉल' विधानावर नाना पटोलेंची एकाच वाक्यात प्रतिक्रिया; विषयचं संपवला म्हणाले.

Nana Patole : राज्यसभा खासदार आणि सुनेत्रा पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी माध्यमांशी बोलताना काँग्रेस पक्षाबाबत काँग्रेसचा महाराष्ट्रात डाऊनफॉल आहे, असे वक्तव्य केले होते. त्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे राजकारण चांगलेच तापले आहे.

काँग्रेसकडून पार्थ पवार यांच्या वक्तव्याचा समाचार घेत त्यांच्यावर बोचरी टीका करत जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. आता काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी पार्थ पवारांच्या वक्तव्यावर भाष्य केले आहे. ते वेळ सांगेल, कोणाचा डाऊनफॉल होईल ते वेळच सांगेल, अशा शब्दांत त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

पार्थ पवार नेमकं काय म्हणाले होते?

सुनेत्रा पवार यांचा बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर पार्थ पवार यांनी माध्यमांशी संवाद साधत प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, सगळे मोठे लोक आहेत, सर्वांना माहिती आहे काय चाललंय. त्यांनी (काँग्रेसने) विचार केला असेल तर करु द्या. पण त्यांना (काँग्रेसला) नंतर काय त्रास होईल महाराष्ट्रात, हे त्यांना दिसेल.

काँग्रेसने बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवार दिल्याने यावर भाष्य करताना पार्थ पवार म्हणाले, लोक विसरत नाहीत. जे दादांचं प्रेम आहे लोकांच्या मनात, अशावेळी एवढ्या मॅच्युअर पार्टीने हा निर्णय घेणे, जिथे एवढे मोठे नेते आहेत, अतिशय चुकीचं आहे.

मला वाटतं की आपण कोणाला थांबवू शकत नाही. जशी वेळ येते तसं सामोरं जावं लागतं. आम्ही सामोरं जाऊ, आम्ही काही कुणाला फोन करणार नाही, जे काही नशिबात लिहिलं आहे, ते बघू काय व्हायचंय ते. फक्त मला वाईट वाटतंय की काँग्रेसचा महाराष्ट्रात डाऊनफॉल आहे, असे वक्तव्य पार्थ पवारांनी काँग्रेसबाबत केले आहे.

काँग्रेसकडून जोरदार प्रत्युत्तर Nana Patole

धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुर्वपुण्याईवर आताच खासदार झालेल्या मुलाने कॉंग्रेस पक्षाच्या डाऊनफॉल बद्दल बोलणं, म्हणजे जरा जास्तच नाही का झालं ? स्वतःच्या वडिलांच्या संशयास्पद अपघाती मृत्यूनंतर लगेच जमीन घोटाळ्यातील चौकशीतून बचावासाठी राजकीय सोय म्हणून शांत राहणाऱ्या, महाशक्तिसमोर सरेंडर झालेल्या या कृतघ्न मुलाने कॉंग्रेस पक्षाबद्दल न बोललेलंच बरं राहील, अशा शब्दांत महाराष्ट्र काँग्रेसने आपल्या सोशल मिडीया एक्सवरून पार्थ पवारांचे नाव न घेता पोस्ट शेअर करत आगपाखड केली आहे.

बारामती विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू होते. मात्र, तसे झाले नाही. काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासोबत सुनेत्रा पवार यांनी फोनद्वारे संवाद साधला होता. त्यांनी बारामती पोटनिवडणुकीसाठी पाठिंबा देण्याची मागणी केली होती. मात्र, काँग्रेसने आकाश मोरे यांना सुनेत्रा पवार यांच्याविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे.

पार्थ पवार आमच्यापेक्षा वयाने लहान : नाना पटोले

खरंतर निवडणूक ही बिनविरोध झाली पाहिजे असं त्यांचं मत आहे, त्यांच्या आईने आमच्या प्रदेशाध्यक्षांना फोन केलेला आहे. अशा पद्धतीने दबाव तंत्राचा वापर करून आणि काँग्रेसवर टीका करून हे प्रश्न सुटणार नाहीत, त्यामुळे पार्थ पवार आमच्यापेक्षा वयाने लहान आहेत, त्यामुळे मी त्यांच्यावर प्रतिक्रिया देण्याचे काही कारण नाही.

सुनेत्रा पवारांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज काल 6 एप्रिल शेवटच्या दिवशी दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांच्यासोबत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, मंत्री छगन भुजबळ आदी नेते उपस्थित होते.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat