Thursday, 22 Jul, 9.00 pm प्रभात

ताज्या बातम्या
नांदेड । सहस्त्रकुंड धबधबा ओव्हरफ्लो

नांदेड : नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या सहस्रकुंड धबधब्याचं पर्यटकांना नेहमीच मोठं आकर्षण राहिलं आहे. दरवर्षी हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची रेलचेल असते.

यंदाही जूनच्या सुरुवातीला यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाल्याने हा धबधबा ओसंडून वाहण्यास सुरूवात झाली होती. आताही गेल्या दोन दिवसांत मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे हा धबधबा फेसाळला आहे. हा धबधबा पर्यटकांचे डोळ्यांचे पारणे फेडणारा आहे.

मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवर असलेला हा धबधबा पर्यटक आणि स्थानिकांना रोजगार देण्यासाठी पर्वणीच ठरतो. उमरखेड शहरापासून 40, यवतमाळपासून 150 तर नांदेडपासून 100 किलोमीटर अंतरावर सहस्रकुंड आहे.

या धबधब्याला पौराणिक जोड असल्याचे सांगण्यात येते. भगवान परशुरामाने येथे बाण मारल्याची अख्यायिका आहे. त्यामुळे या ठिकाणाला 'बाणगंगा' असंही म्हणतात. येथे नदीपात्रात वेगवेगळे लहान-मोठे अनेक कुंड आहेत. त्यामुळे याला 'सहस्रकुंड' हे नाव प्रचलित झाल्याचं स्थानिक नागरिक सांगतात.

पैनगंगा नदीवर हे ठिकाण आहे. या ठिकाणी नदीचं विस्तीर्ण पात्र आणि उंच पाषाण अशा नैसर्गिक स्थितीमुळे हा धबधबा तयार झाला आहे. सुमारे 80 फुट त्याची उंची असल्याचं सांगण्यात येतं. धबधब्याचं मनोहारी व विहंगम दृश्य पाहण्यासाठी विदर्भ, मराठवाडा, तेलंगणा, आंध्रप्रदेश आणि कर्नाटकातून पर्यटक मोठ्या संख्येनं इथं येतात.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top