Tuesday, 22 Sep, 10.44 am प्रभात

ताज्या बातम्या
नफेखोरीमुळे शेअर निर्देशांक कोसळले

मुंबई - युरोपसह अनेक देशांत करोना संसर्गाचे प्रमाण वाढू लागल्यामुळे लॉकडाऊन काही प्रमाणात सुरू करण्यात आले आहे. त्याचा अर्थव्यवस्थेवर पुन्हा परिणाम होण्याची शक्‍यता वाढल्यामुळे जागतिक शेअरबाजारातील निर्देशांक सोमवारी कोसळले. त्याचा संसर्ग भारतीय शेअरबाजारांना होऊन निर्देशांकांत घट झाली. डेन्मार्क, ग्रीस, स्पेन या देशांत लॉकडाऊन सुरू झाले आहे. तर ब्रिटनमध्ये लवकर सुरू होण्याची शक्‍यता आहे.

सोमवारी मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 811 अंकांनी म्हणजे 2.09 टक्‍क्‍यांनी कोसळून 38,034 अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक 254 अंकांनी कमी होऊन 11,250 अंकांवर बंद झाला.

इंडसइंड बॅंकेचा शेअर आज 8 टक्‍क्‍यांनी कोसळला. त्याचबरोबर रिलायन्स इंडस्ट्रीज, आयसीआयसीआय बॅंक, भारती एअरटेल, टाटा स्टील, महिंद्रा, ऍक्‍सिस बॅंक, ओएनजीसी या कंपन्याच्या शेअरनी सपाटून मार खाल्ला. मात्र, अशा परिस्थितीतही कोटक बॅंक, इन्फोसिस, टीसीएस या कंपन्यांचे शेअर वधारले.

युरोपातील शेअरबाजाराचे निर्देशांक कोसळल्यानंतर आशियाई शेअरबाजाराचे निर्देशांक कोसळले. त्यामुळे सकाळपासूनच भारतीय शेअरबाजारांमध्ये विक्रीचा जोर होता, असे ब्रोकर्सनी सांगितले. काही देशात लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर त्याचा आंतरराष्ट्रीय प्रवास आणि व्यापारावर परिणाम वाढणार आहे. आजच्या विक्रीचा जोर इतका जास्त होता की सर्वच क्षेत्राचे निर्देशांक 6 टक्‍क्‍यांपर्यंत कमी झाले.

मिडकॅप आणि स्मॉलकॅपही 4 टक्‍क्‍यांपर्यंत कमी झाल्याचे दिसून आले. जिओजी वित्तीय सेवा या संस्थेचे प्रमुख संशोधक विनोद नायर यानी सांगितले की, युरोपातील विकसित देशात पुन्हा लॉकडाऊन सुरू होत असल्यामुळे त्याचा जागतिक व्यापारावर परिणाम होणार आहे. त्यामुळे शेअरबाजारातील उमेद कमी झाली आहे. लस उपलब्ध होईपर्यंत शेअरबाजाराचे निर्देशांक खऱ्या अर्थाने स्थिर होणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

4.23 लाख कोटींचे नुकसान
शेअरबाजाराचे निर्देशांक सव्वादोन टक्‍क्‍यांनी कमी झाल्यामुळे आज एकाच दिवसात गुंतवणूकदारांच्या गुंतवणूक मूल्यात 4.23 लाख कोटी रुपयांची घट झाल्याचे दिसून आले. आता लघुपल्ल्यात परतावा कमी मिळण्याची शक्‍यता निर्माण झाल्यामुळे शेअरबाजारात नफेखोरी झाली. आगामी काळातही किरकोळ गुंतवणूकदार जास्त सावध राहून व्यवहार करण्याची शक्‍यता आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top