Natasha Awhad : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) एनडीएमध्ये सत्तेत सहभागी होणार असल्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले आहे. काही दिवसांपूर्वी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत जाऊन भेट घेतली होती.
या भेटीनंतर विविध राजकीय तर्क-वितर्कांना अधिकच बळ मिळाले.
त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे आणि बजरंग सोनवणे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील यांनीही शरद पवार यांची भेट घेतली. या भेटींमुळे राजकीय चर्चांना आणखी वेग आला. या सलग होणाऱ्या भेटींच्या सत्रामुळे आगामी काळात मोठ्या राजकीय घडामोडी घडणार असल्याचे संकेत मिळत असल्याची चर्चांना उकळी फुटली आहे. (Natasha Awhad)
अशातच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांची कन्या नताशा आव्हाड यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर केलेली एक पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. त्यांच्या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना तोंड फुटले आहे.
काय म्हणाल्या नताशा आव्हाड? (Natasha Awhad)
“जेव्हा जेव्हा एखाद्या विशिष्ट राजकीय पक्षाचे खासदार आणि नेते सत्तेत जाण्याचा निर्णय घेतात, तेव्हा काहीतरी मोठी घटना घडते. कदाचित त्यांनी याकडे ईश्वराचा संकेत म्हणून पाहावे आणि आपण जिथे आहोत तिथेच राहण्याचा निर्णय घ्यावा.” त्यांनी केलेल्या या ट्वीटला सध्याच्या घडणाऱ्या राजकीय घडामोडींमुळे विशेष महत्व प्राप्त झाले आहे.
शरद पवार म्हणाले… (Natasha Awhad)
दरम्यान, शरद पवारांनी मोदींची दिल्लीत भेट घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल आणि राज्यसभा खासदार पार्थ पवार यांनी दुसऱ्याच दिवशी शरद पवारांची भेट घेतली असल्याची माहिती समोर आली होती. या भेटींमुळे दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर लवकरच मोठी बातमी मिळणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात होती. या चर्चांवर शरद पवारांनी स्वतः बारामती येथे भाष्य करत त्यांचा काहीही संबंध नाही अशा एकाच वाक्यात प्रतिक्रिया दिली. त्यामुळे ज्याकाही चर्चा सुरू आहेत त्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. मात्र, आगामी काळात महत्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता नाकारता येणार नसून याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

