Dailyhunt
Navjot Kaur Sidhu: नवज्योत कौर सिद्धू यांचे पक्षातून निलंबन

Navjot Kaur Sidhu: नवज्योत कौर सिद्धू यांचे पक्षातून निलंबन

प्रभात 4 months ago

चंदिगढ : कॉंग्रेसचे नेते आणि माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू यांच्या पत्नी नवज्योत कौर यांनी केलेल्या वक्तव्याने राजकीय वादंगाला तोंड फुटले. ते वक्तव्य कॉंग्रेसची कोंडी करणारे ठरले.

त्यानंतर कॉंग्रेसच्या पंजाब शाखेने सिद्धू यांच्या पत्नीला पक्षातून निलंबित केले. त्या कारवाईमुळे सिद्धू दाम्पत्याने पक्षाची नाराजी ओढवून घेतल्याचे सूचित झाले.

पंजाबमध्ये कॉंग्रेसची सत्ता असताना सिद्धू यांनी त्या राज्याचे मंत्रिपद भुषवले. पक्षाने त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष पदाची धुराही सोपवली. मात्र, नंतरच्या काळात पक्षात फारसे महत्व दिले जात नसल्याच्या भावनेतून ते नाराज झाले. त्यातून काही काळापासून ते फारसे सक्रिय नाहीत. पक्षकार्यापासून ते अंतर ठेऊन आहेत. अशात त्यांच्या पत्नी आणि माजी आमदार नवज्योत कौर यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना भूमिका मांडली. त्यातून सिद्धू यांची पुन्हा सक्रिय होण्याची तयारी असल्याचे पण ती तयारी सशर्त असल्याचे सूचित झाले.

पंजाबमध्ये वर्ष २०२७ मध्ये विधानसभा निवडणूक होईल. त्यासाठी सिद्धू यांना कॉंग्रेसने मुख्यमंत्रिपदाचा चेहरा बनवल्यास ते पुन्हा सक्रिय होतील, असे त्या म्हणाल्या. पुढे बोलताना नवज्योत कौर यांनी केलेले वक्तव्य सनसनाटी निर्माण करणारे ठरले. कॉंग्रेसमध्ये मुख्यमंत्रिपदाची आकांक्षा बाळगणारे किमान ५ नेते आहेत. ते सिद्धू यांना पुढे येऊ देणार नाहीत. आम्ही नेहमीच पंजाबच्या हिताविषयी बोलतो. मात्र, मुख्यमंत्रिपद मिळवण्यासाठी आमच्याकडे ५०० कोटी रूपये नाहीत, असे त्या म्हणाल्या. त्यातून पंजाब कॉंग्रेसमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली.

त्याशिवाय, इतर पक्षांना कॉंग्रेसला घेरण्याची संधी मिळाली. कॉंग्रेसमधील पैशांच्या थैलीचे राजकारण चव्हाट्यावर आल्याचे टीकास्त्र भाजप आणि इतर पक्षांनी सोडले. राजकीय वादंग निर्माण झाल्यानंतर नवज्योत कौर यांनी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. कॉंग्रेसने कधीच आमच्याकडे कुठली मागणी केली नाही.

इतर कुठल्या पक्षाकडून सिद्धू यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा बनवला जाईल का, असा प्रश्‍न मला विचारण्यात आला. तशा प्रस्तावासाठी आमच्याकडे पैसे नसल्याचे उत्तर मी दिले, अशी सारवासारव त्यांनी केली. मात्र, त्यांच्या स्पष्टीकरणाने कॉंग्रेसचे समाधान झाले नसल्याचे निलंबनाच्या कारवाईतून सूचित होत आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat