Monday, 13 Jul, 9.16 am प्रभात

ताज्या बातम्या
नव्या शिलेदारांनी केला माध्यमिकचा अभ्यास

सातारा (प्रतिनिधी) - सातारा जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागातील प्रशिक्षणार्थी उपशिक्षणाधिकारी यांना या विभागातील अभ्यासाअंती छोटेखानी समारंभात निरोप देण्यात आला. मागील दोन महिन्यांपासून माध्यमिकचे प्रशिक्षण घेणाऱ्यांमध्ये डीवायएसपी पदी निवड झालेले अमर माहिते, पुजा नांगरे आणि अमोल जंगले यांचा समावेश आहे. या कालावधीत त्यांनी शिक्षणाधिकारी (माध्य) राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कामांची माहिती घेतली. यामध्ये प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र, स्वयंअर्थसहाय्यित शाळा, एम.ई.पी.एस. कायदा व नियम, माहिती अधिकार, माध्यमिक शाळा वार्षिक तपासणी, मोफत पाठ्यपुस्तक व पुस्तकपेढी योजना, इन्स्पायर ऍवॉर्ड, उपशिक्षणाधिकारी यांची कर्तव्ये व जबाबदाऱ्या, अधीक्षक (रा.प.) यांचे कर्तव्य व जबाबदाऱ्या, विस्तार अधिकारी यांचे कामकाज व विविध शासकीय योजनांची माहिती घेतली. उपशिक्षणाधिकारी सुधीर महामुनी, रमेश चव्हाण आणि अधिक्षक हेमंत खाडे यांचे त्यांना सहकार्य व मार्गदर्शन मिळाले. प्रशिक्षणार्थी उपशिक्षणाधिकारी यांनी जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था फलटण, शासकीय विद्यानिकेतन पुसेगाव, टंकलेखन संस्था तसेच माध्यमिक शाळांनाही क्षेत्रभेटी देवून तेथील कामकाज समजून घेतले.

शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर यांचे दालनात प्रशिक्षणार्थी उपशिक्षणाधिकारी यांना निरोप देण्यात आला. यावेळी तिघांनीही मनोगतात स्पष्ट केले की, राज्यात 50 हून अधिक उपशिक्षणाधिकारी विविध जिल्ह्यात प्रशिक्षण घेत आहेत. सातारा माध्यमिक विभागाने तयार केलेला आराखडा सर्व बॅचला उपयोगी ठरत आहे. अमर मोहिते व पुजा नांगरे यांनी स्वरचित काव्यवाचन केले.

अमर मोहिते म्हणाले, डीवायएसपी पदासाठी निवड झालो असली तरी पुढील आदेश येईपर्यंत उपशिक्षणाधिकारी पदाचे उर्वरित प्रशिक्षण घेणार आहे. यापुढे तिघेही प्राथमिक विभागात व त्यानंतर सातारा जिल्ह्यातील विविध तालुक्‍यात शिक्षण विभागातील विविध पदांच्या जबाबदाऱ्या पाहणार आहेत. यावेळी सहाय्यक प्रशासन अधिकारी उषा कुंभारे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी सुजाता गायकवाड, शिक्षण विस्तार अधिकारी श्रीकांत जगदाळे, मनिषा चंदुरे, मंगल मोरे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी मारुती सपकाळ व इतर कर्मचारी उपस्थित होते.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top