Dailyhunt
New District :महाराष्ट्राला 37वा जिल्हा मिळणार? राज्य सरकारचा मोठा निर्णय

New District :महाराष्ट्राला 37वा जिल्हा मिळणार? राज्य सरकारचा मोठा निर्णय

New District : राज्यात नव्या जिल्ह्याच्या निर्मितीबाबत पुन्हा चर्चा रंगली असून बुलढाणा जिल्ह्यातील ताज्या निर्णयामुळे 'खामगाव जिल्हा' होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्य सरकारच्या नव्या प्रशासकीय निर्णयामुळे या चर्चेला मोठे बळ मिळाले आहे.

२ एप्रिल २०२६ रोजी महसूल यंत्रणेच्या पुनर्रचनेचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार बुलढाणा जिल्हा हा मोठ्या जिल्ह्यांच्या यादीत समाविष्ट करण्यात आला असून प्रशासन अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात आला आहे. त्याचाच एक भाग म्हणून खामगाव येथे नवीन अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करण्यात येणार आहे.

या निर्णयामुळे बुलढाणा आणि खामगाव अशी दोन प्रशासकीय केंद्रे निर्माण होणार आहेत. त्यामुळे मुख्यालयावरील ताण कमी होण्यास मदत होईल आणि खामगाव हे स्वतंत्र प्रशासकीय केंद्र म्हणून विकसित होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर खामगावला स्वतंत्र जिल्ह्याचा दर्जा देण्याची मागणी पुन्हा जोर धरत आहे.

दरम्यान, तालुका पातळीवरही प्रशासन सुलभ करण्यासाठी शासनाने मोठे पाऊल उचलले आहे. मेहकर तालुक्यातील डोणगाव, सिंदखेडराजा तालुक्यातील साखरखेर्डा आणि खामगाव तालुक्यातील लाखनवाडा येथे नवीन अप्पर तहसील कार्यालये सुरू करण्यात येणार आहेत.

या निर्णयामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना महसूल संबंधित कामांसाठी दूरवर प्रवास करण्याची गरज कमी होणार आहे. स्थानिक पातळीवरच सेवा उपलब्ध होणार असल्याने वेळ आणि खर्चाची बचत होईल.

एकूणच, प्रशासनाचे विकेंद्रीकरण आणि सुविधा वाढवण्याच्या या निर्णयामुळे भविष्यात महाराष्ट्राला 37वा जिल्हा मिळण्याच्या चर्चांना अधिक वेग मिळाला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat