Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Newasa News : मुळा' आणि 'ज्ञानेश्वर' कारखान्यांवर निवडणुकीचे सावट; 'तडजोड' होणार की राजकीय सामना रंगणार?

Newasa News : मुळा' आणि 'ज्ञानेश्वर' कारखान्यांवर निवडणुकीचे सावट; 'तडजोड' होणार की राजकीय सामना रंगणार?

Newasa News : नेवासे तालुक्याच्या (Newasa News) आर्थिक प्रगतीची आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांची जीवनदायिनी ठरलेल्या मुळा आणि ज्ञानेश्वर या दोन सहकारी साखर कारखान्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीचे सावट यंदा गडद होण्याची चिन्हे दिसत आहेत.

राज्यातील बदलत्या सत्तासमीकरणांच्या पार्श्वभूमीवर, विरोधकांनी या दोन्ही कारखान्यांच्या निवडणुकांसाठी (Newasa News) जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे यंदा प्रत्यक्षात मतपेटीतून फैसला होणार की नेहमीप्रमाणे ऐनवेळी विरोधक माघार घेऊन तडजोड करणार, याकडे आता जिल्ह्यातील सहकार क्षेत्राचे आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

सहकार चळवळीचे माहेरघर असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यात ३१ डिसेंबर १९४८ रोजी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी आशिया खंडातील पहिल्या सहकारी साखर कारखान्याची लोणी येथे स्थापना करून ग्रामीण भागाचा कायापालट केला होता.

आतापर्यंत जिल्ह्यातील राजकारण्यांनी सहकार टिकवण्यासाठी नेहमीच राजकारण बाजूला ठेवून ही चळवळ तळहाताच्या फोडाप्रमाणे जपली. मात्र, आता राजकीय परिस्थिती बदलल्यामुळे घुले आणि गडाख यांच्याच तालमीत राजकारणाचे (Newasa News) धडे गिरवलेले आमदार विठ्ठलराव लंघे-पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या दोन्ही कारखान्यांच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांसमोर आव्हान उभे करण्यासाठी चांगलीच कंबर कसली आहे.

सहकार महर्षी लोकनेते स्वर्गीय मारुतराव घुले पाटील आणि माजी खासदार यशवंतराव गडाख पाटील या गुरु-शिष्यांच्या जोडगोळीने उजाड माळरानावर उभे केलेले हे कारखाने तालुक्याचे आर्थिक वैभव ठरले. आता याच कारखान्यांवर निवडणुकीचे बालंट येणार की पुन्हा वरिष्ठ पातळीवर खलबत्ते होऊन ‘समझोता एक्सप्रेस’ धावणार, याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता आहे.

आमदार विठ्ठलराव लंघे-पाटील यांना निवडणूक लढवण्यासाठी अनेक राजकीय रथी-महारथींकडून गळ घातली जात असल्याने तूर्तास तरी निवडणूक होण्याची शक्यता दाट आहे.

सहकारी कारखान्याची निवडणूक लढवणे ही आर्थिक आणि संघटनात्मकदृष्ट्या सोपी बाब नसली, तरी केवळ प्रस्थापित साखर सम्राटांना विरोध दर्शवण्यासाठी हा निवडणुकीचा बागुलबुवा उभा केला जात नाही ना, अशी शंकाही सर्वसामान्यांमधून उपस्थित होत आहे.

दुसरीकडे, काही नेत्यांना सत्तेतून बाहेर फेकले गेल्यामुळेच या निवडणुका लादल्या जात असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. सध्या तरी विरोधकांनी कारखान्याच्या कारभाराचा लेखाजोखा आणि कथित भ्रष्टाचाराची जंत्री गोळा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे.

त्यामुळे ही निवडणूक होणारच असा दावा केला जात असला, तरी प्रत्यक्ष अर्ज माघारीच्या शेवटच्या टप्प्यात पडद्यामागे राजकीय नाट्य रंगून तडजोड होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. परिणामी, नेवाशाच्या या दोन्ही कामधेनूंच्या निवडणूक वाटचालीबाबत सध्या संपूर्ण तालुक्यात कमालीचे कुतूहल निर्माण झाले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat