Nicholas Pooran smashes his fastest fifty against MI : आयपीएल २०२६ च्या हंगामात लखनौ सुपरजायंट्सचा स्फोटक फलंदाज निकोलस पूरन अखेर फॉर्ममध्ये परतला आहे. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात पूरनने तुफानी फलंदाजी करत अवघ्या २१ चेंडूंत ६३ धावांची धडाकेबाज खेळी केली.
या डावात त्याने प्रत्येक दुसऱ्या चेंडूवर षटकार मारण्याचा पराक्रम केला. पूरनने केवळ १६ चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले, जे मुंबईविरुद्धचे त्याचे आतापर्यंतचे सर्वात वेगवान अर्धशतक ठरले आहे.
निकोलस पूरनने मोडले दोन मोठे रेकॉर्ड्स –
निकोलस पूरनने आपल्या ५० धावांच्या खेळीत तब्बल ७ षटकार ठोकले, तर संपूर्ण डावात त्याच्या बॅटमधून ८ गगनचुंबी षटकार निघाले. या शानदार खेळीसह पूरनने अनेक मोठे विक्रम आपल्या नावावर केले आहेत. त्याने २० पेक्षा कमी चेंडूंत पाचव्यांदा अर्धशतक ठोकण्याचा पराक्रम केला आहे. या बाबतीत त्याने वैभव सूर्यवंशी (४ वेळा) याला मागे टाकले असून, आता त्याच्यापुढे केवळ अभिषेक शर्मा (६ वेळा) आहे. याशिवाय, तो लखनौ सुपरजायंट्ससाठी सर्वात वेगवान अर्धशतक ठोकणारा फलंदाजही ठरला आहे.
संघ व्यवस्थापनाची रणनीती ठरली चुकीची –
निकोलस पूरनची ही खेळी संघाच्या रणनीतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरली. गेल्या ८ सामन्यांतून त्याला एकदाही नंबर ३ वर फलंदाजीसाठी पाठवण्यात आले नव्हते. मात्र, या सामन्यात जेव्हा त्याला त्याच्या पसंतीच्या क्रमांकावर संधी मिळाली, तेव्हा त्याने आपण किती धोकादायक फलंदाज आहोत हे सिद्ध करून दाखवले.
डावाच्या सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेत पूरनने डावाच्या चौथ्या चेंडूवरच षटकार खेचला. त्याने विल जॅक्सच्या एकाच षटकात ३ षटकार, तर गझनफरच्या गोलंदाजीवर २ षटकार लगावले. त्यानंतर दीपक चहरच्या चेंडूवर षटकार मारून त्याने आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याच्या या खेळीने लखनऊ संघाला एका मजबूत स्थितीत पोहोचवले.

