Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
NTA Controversy : नीटनंतर आता 'या' मोठ्या परीक्षेचा फज्जा! एनटीएचा  सावळागोंधळ थांबेना, विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात?

NTA Controversy : नीटनंतर आता 'या' मोठ्या परीक्षेचा फज्जा! एनटीएचा सावळागोंधळ थांबेना, विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात?

प्रभात 4 months ago

NTA Controversy - देशभरातील वैद्यकीय प्रवेशासाठी अनिवार्य असलेल्या नीट परीक्षेतील पेपरफुटीच्या गंभीर प्रकरणावरून आधीच वादाच्या भोवऱ्यात सापडलेली नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) पुन्हा एकदा नव्या वादात अडकली आहे.

नीट पेपरफुटीमुळे आधीच विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागलेले असताना, शनिवारी एनटीएमार्फत घेण्यात आलेल्या सीयुईटी यूजी या राष्ट्रीय पातळीवरील प्रवेश परीक्षेचाही पुरता फज्जा उडाल्याचे समोर आले आहे.

नियोजिनशून्य कारभार आणि तांत्रिक बिघाडामुळे या परीक्षेचा बोजवारा उडाला असून, एनटीएच्या परीक्षा व्यवस्थापन, विश्वासार्हतेवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. देशातील नामांकित केंद्रीय विद्यापीठांमध्ये पदवी प्रवेशासाठी सीयुईटी ही अत्यंत महत्त्वाची आणि अनिवार्य परीक्षा मानली जाते. शनिवारपासून ही परीक्षा देशभरात सुरू झाली. मात्र, पहिल्याच दिवशी अनेक परीक्षा केंद्रांवर तांत्रिक अडचणींचा डोंगर उभा राहिला.

सर्व्हर डाऊन असणे, कॉम्प्युटर स्क्रीन न चालणे अशा तांत्रिक कारणांमुळे विद्यार्थ्यांना तब्बल दोन ते तीन तास ताटकळत राहावे लागले. अनेक केंद्रांवर गोंधळामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा न देताच घरी परतावे लागले. एकीकडे नीट परीक्षेतील गैरव्यवहारामुळे आमच्या मुलांचे वर्ष वाया जाण्याची भीती आहे, तर दुसरीकडे सीयुईटीसारख्या मोठ्या परीक्षेतही तोच निष्काळजीपणा होत असल्याच्या संतप्त भावना पालकांतून उमटत आहेत.

नीट पेपरफुटीच्या हायप्रोफाईल घोटाळ्याची सीबीआय चौकशी सुरू असून, या प्रकरणाचे धागेदोरे थेट पुण्यापर्यंत पोहोचले आहेत. पुण्यासह विविध भागांतून काही संशयित शिक्षकांना अटकही झाली आहे. त्यामुळे टीकेची झोड उठत असताना आणि एजन्सीचे अधिकारी चौकशीच्या फेऱ्यात असतानाच, सीयुईटी परीक्षेच्या नियोजनावरून राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांचे आयोजन करणाऱ्या सर्वोच्च संस्थेचा कारभार इतका सुमार कसा असू शकतो? असा सवाल आता उपस्थित होत असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी पालकांतून जोर धरू लागली आहे.

आणखी शिक्षक सीबीआयच्‍या रडारवर
नीट पेपरफुटीप्रकरणी आतापर्यंत पुण्यातून चौघांना अटक झाली आहे. यात अवघ्या एक ते सहा महिन्यांत सेवानिवृत्त होणाऱ्या दोन ज्येष्ठ शिक्षिकांचाही समावेश असल्याने शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. त्यानंतर सीबीआयचा संशय आणखी बळावला आहे. सध्या पुण्यातील दोन नामांकित संस्थांमधील काही कार्यरत आणि सेवानिवृत्त शिक्षक सध्या सीबीआयच्या रडारवर आहेत. त्यांचीही लवकरच चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat