Sunday, 20 Oct, 8.06 am प्रभात

मुख्य पान
पडझडीनंतर रोहित-अजिंक्‍यने सावरले

रोहितच्या विक्रमांची बरसात सुरुच…
रोहित शर्माने पहिल्या कसोटीत 176 आणि 127 धावा केल्या होत्या. रांची कसोटीत कारकिर्दीतील सहावे शतक (117 नाबाद) झळकावून एकाच कसोटी मालिकेत तीन शतके झळकावण्याचा विक्रम प्रस्थापित केला आहे. त्याने महान फलंदाज सुनिल गावसकर यांच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. गावसकर यांनी एका मालिकेत तीन शतके दोन वेळा झळकावली होती. रोहितनं एका कसोटी मालिकेमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचाही नवा विक्रम प्रस्थापित केला. कसोटी मालिकेत सर्वाधिक 13 षटकार ठोकण्याचा विक्रम इंग्लंडच्या बेन स्टोक्‍सच्या नावावर होता. रोहितनं आज पहिला षटकार मारताच हा विक्रम मोडला. एका वर्षात 9 शतके ठोकणाऱ्या सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशीही त्याने बरोबरी केली. ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर आणि आफ्रिकेचा ग्रॅम स्मिथ यांनीदेखील हा विक्रम केला होता. या मालिकेत सर्वाधिक धावा, चौकार आणि षटकार त्यानेच मारले आहेत.

रांची: भारतीय कर्णधार विराट कोहलीने पुन्हा एकदा नाणेफेक जिंकून फलंदाजी घेतल्यानंतर, सकाळच्या पहिल्या सत्रात भारताच्या तीन विकेट्‌स लवकर गेल्याने भारतीय गोटात चिंतेचे वातावरण पसरलेले असताना, मधल्या फळीतील भरवशाचा फलंदाज अजिंक्‍य रहाणेने सलामीवीर रोहित शर्माला समर्थ साथ देत भारताच्या पहिल्या डावाला आकार दिला. अपुरा प्रकाश आणि पावसाचा व्यत्यय यामुळे दिवसभराचा खेळ संपला त्यावेळी भारताने 3 गडी बाद 224 धावा केल्या होत्या.

पुणे कसोटीप्रमाणे मोठ्या धावसंख्येचे लक्ष्य ठेवत सलामीवीर रोहित शर्मा आणि मयंक आगरवाल यांनी भारताची सुरुवात आश्‍वासक केली. मात्र, रांची कसोटीच्या पहिल्या दिवसाचे पहिले सत्र आफ्रिकेच्या गोलंदाजांनी गाजवले. सर्वप्रथम संघाच्या अवघ्या 12 धावा झालेल्या असताना कागिसो रबाडाच्या गोलंदाजीवर तिसऱ्या स्लिपमध्ये आगरवालला (10) डीन एल्गरने टिपले. पाठोपाठ आलेल्या चेतेश्‍वर पुजाराला (0) रबाडानेच पायचित केले.

विक्रमी कामगिरी करण्याच्या इराद्याने मैदानात उतरलेल्या कर्णधार विराट कोहलीचीही आफ्रिकेने डाळ शिजू दिली नाही. त्याला कसोटी पदार्पण करणाऱ्या ऍनरिच नोर्जे याने अवघ्या 12 धावांवर पायचित केले. पहिल्या सत्राच्या अखेरीस भारताची धावसंख्या 3 बाद 71 झाली होती. नाणेफेक जिंकण्यात आफ्रिकन कर्णधार फाफ डू प्लेसिस सातत्याने अपयशी ठरत असल्याने त्याच्यासह टेंभा बावुमा 'प्रॉक्‍सी कॅप्टन' अर्थात 'नाणेफेकीसाठीचा कर्णधार' म्हणून मैदानात आला. पण तोही कमनशिबीच ठरला.

संघाच्या 40 धावा फलकावर लागायच्या आतच तीन मोहरे परतल्यानंतर भारतीय फलंदाज बॅकफूटवर जातील, असा अंदाज होता. मात्र, आक्रमक रोहित शर्माला अजिंक्‍य रहाणेनेही तितकीच आक्रमक साथ देत दोघांनी आपापली अर्धशतके आणि शतकी भागीदारी रचत भारताच्या तंबूतील तणाव कमी केला. एका बाजूला संघाची पडझड होत असताना दुसऱ्या बाजूने रोहितने किल्ला लढवत 130 चेंडूंमध्ये चार षटकार आणि 13 चौकार लगावत आपलं शतक साकारलं. त्यानं दिवसअखेर नाबाद 117 धावा (164 चेंडू) केल्या. आजच्या शतकासह रोहितनं कसोटी क्रिकेटमध्ये दोन हजार धावांचा टप्पाही ओलांडला.

रोहित हा द. आफ्रिकेच्या विरोधात एकाच मालिकेत सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याने अनेक दिग्गज भारतीय फलंदाजांना मागे टाकलं आहे. त्यात मोहम्मद अझरुद्दीन (388), वीरेंद्र सेहवाग (372), मयांक आगरवाल (340), विराट कोहली (319) आणि सचिन तेंडुलकर (326) यांचा समावेश आहे. रोहितच्या साथीला आलेल्या रहाणेने आज परिपक्व अशा आक्रमक खेळीने क्रिकेट शौकिनांची वाहवा मिळवली. रहाणेने रोहितच्या साथीत 185 धावांची नाबाद भागीदारी नोंदवत भारतीय संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारून देण्यात आपला हातभार लावला.

रहाणेने आपले 21 वे अर्धशतक 70 चेंडूत पूर्ण केले आणि आपली उपयुक्‍तता पुन्हा एकदा सिद्ध केली. रोहित आणि अजिंक्‍यने चौथ्या विकेटसाठी 28.1 षटकांतील 170 चेंडूंत शतकी भागीदारी रचली. त्यामध्ये रोहितच्या 50 तर अजिंक्‍यच्या 49 धावांचा समावेश होता. या दोघांनी दरम्यान, भारताचा कर्णधार विराट कोहलीने शनिवारी सकाळी येथे तिसऱ्या आणि अंतिम कसोटीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. या मालिकेत 2-0 ने आघाडीवर असलेल्या भारताने इशांत शर्माला विश्रांती देत त्याच्या जागी स्थानिक गोलंदाज शहाबाज नदीमला 296 वा भारतीय खेळाडू म्हणून कसोटी पदार्पणाची संधी दिली.

आफ्रिकेने आपल्या संघात तब्बल पाच बदल केले. दुखापतग्रस्त आयडन मार्करामशिवाय वेर्नॉन फिलॅंडर, थेयनिस डी ब्रूयन, सेनुरान मुथुसामी आणि केशव महाराज यांना विश्रांती देत हेनरिक क्‍लॅसेन, जॉर्ज लिंड्‌टे (दोघांचे कसोटी पदार्पण), लुंगी एनगीडी, झुबैर हमजा आणि डेन पायड्‌स यांना आफिकेने संघात स्थान दिले.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top