Monday, 21 Sep, 5.05 am प्रभात

महाराष्ट्र
पैशांची बचत आणि सुविधाही; विमानतळाहून थेट पीएमपी सुरू होणार

पुणे - विमानाने पुण्यात दाखल होणाऱ्या प्रवाशांसाठी बससेवा उपलब्ध व्हावी, यासाठी पीएमपी आणि विमानतळ प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत होते. यासाठी पाच मार्ग प्रस्तावित असून, सध्या याबाबत प्रवाशांकडून मते जाणून घेण्यात येत आहेत.

विविध ठिकाणांहून पुणे विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांना अनेकदा विमानतळापासून इच्छित स्थळी प्रवास करण्यात अडचणी येतात. याच पार्श्वभूमीवर पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपी) विमानतळाहून शहरातील काही मार्गांवर सेवा देण्यात येणार होती. याबाबत विमानतळ प्रशासनाशी चर्चा देखील झाली आहे. ऑक्टोबरपासून ही सेवा सुरू होण्याची चिन्हे आहेत.

यापूर्वी देखील पीएमपीकडून विमानतळापासून हिंजवडी, कोथरूड आदी मार्गांवर बससेवा देण्यात येत होती. मात्र त्यावेळी प्रवाशांचा अपेक्षित प्रतिसाद मिळाला नव्हता. नव्या प्रस्तावानुसार, विमानतळाहून हडपसर, स्वारगेट, कोथरूड, हिंजवडी आणि निगडी या मार्गांवर सेवा प्रस्तावित असून, या मार्गांवर ई-बसेस धावणार असल्याची शक्यता आहे. सध्या याबाबत प्रवाशांची मते जाणून घेण्यात येत असून, पुणे विमानतळाच्या ट्वीटरद्वारे देखील याबाबतची पसंती विचारण्यात आली.

हे आहेत प्रस्तावित मार्ग

  • विमानतळ-नगररस्ता- चंदननगर - मगरपट्टा - हडपसर
  • विमानतळ- कल्याणी नगर- वाडिया कॉलेज-सेव्हन लव्हज चौक- स्वारगेट
  • विमानतळ-पुणे स्टेशन- मनपा-डेक्कन- कोथरूड
  • विमानतळ-पुणे स्टेशन-पुणे विद्यापीठ- वाकड पूल - हिंजवडी
  • विमानतळ-विश्रांतवाडी-भोसरी-पिंपरी-निगडी
Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top