Thursday, 15 Aug, 6.06 am प्रभात

मुख्य पान
पाकिस्तानच्या पंतप्रधानांची भारताला युद्धाची धमकी

लाहोर: आता भारताला धडा शिकवण्याची वेळ आली आहे. आम्ही युद्धासाठी सज्ज आहोत. दोन्ही राष्ट्रांत पुन्हा युद्ध झाले तर त्याला भारतच जबाबदार असेल, असे म्हणत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताला युद्धाची धमकी दिली आहे.

पाकव्याप्त काश्‍मीरमधील मुजफ्फराबादमध्ये इम्रान खान यांनी पाक जनतेला संबोधित केले. जम्मू काश्‍मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटवल्यानंतर नाराजी व्यक्त केलेल्या इम्रान खान यांनी यावेळी भारताविरुद्ध युद्धासाठी तयार असल्याचे म्हटले आहे. भारत पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीला भारतच जबाबदार असेल, असा उल्लेखही त्यांनी केला. पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये भारताने कोणतीही कारवाई केली तर आम्ही शांत बसणार नाही. पाकिस्तानी लष्करासोबतच सर्व जनता भारताविरुद्ध मैदानात उतरेल, असे ते म्हणाले आहेत.

त्याचबरोबर पुढे बोलताना इम्रान खान म्हणाले की, भाजपा आणि संघाची विचारधारा मुसलमानांच्या विरोधात आहे. ते भारतात राज्य करत आहेत. आमच्याकडून प्रत्येक मंचावर काश्‍मीरचा मुद्दा उपस्थित केला जाणार आहे. मोदींना काश्‍मीरचा प्रश्न महागात पडणार असल्याचेही इम्रान खान यावेळी म्हणाले. तसेच पुढे ते म्हणाले की, मी जगभरात काश्‍मीरसाठी आवाज उठवेन, प्रत्येकाला आरएसएसच्या विचारधारेसंदर्भात माहिती देईन.

भाजपा भारतातल्या मुस्लिमांचा आवाज दाबत आहे. त्यांना पाकिस्तानात जाण्याची धमकी दिली जात आहे. त्यामुळे पाकिस्तान काश्‍मीरचा मुद्दा हा जगातल्या प्रत्येक स्तरावर उपस्थित करत राहील. गरज पडल्यास आम्ही आंतरराष्ट्रीय न्यायालयातही जाऊ, येत्या काळात लंडनमध्ये मोठी रॅली काढण्यात येणार आहे. एकीकडे संयुक्त राष्ट्राची महासभा सुरू असेल, तर दुसरीकडे पाकिस्तान विरोध प्रदर्शन करेल. असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top