Dailyhunt
Palasnath Yatra : पळसदेवचा आखाडा गाजला! आखाड्यात रंगली १५० मल्लांची दंगल; पाहा कोण ठरलं 'मैदानाचा राजा'

Palasnath Yatra : पळसदेवचा आखाडा गाजला! आखाड्यात रंगली १५० मल्लांची दंगल; पाहा कोण ठरलं 'मैदानाचा राजा'

Palasnath Yatra - पळसदेव येथे हनुमान जयंती व ग्रामदैवत श्री पळसनाथ यात्रेनिमित्त आयोजित कुस्ती मैदान नामवंत मल्लांनी हजेरी लावली होती. या आखाड्यात पार पडलेल्या सुमारे १५० कुस्त्यांनी कुस्तीशौकिनांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.

अटीतटीच्या झालेल्या प्रथम क्रमांकाच्या लढतीत माऊली कोकाटे याने माऊली जमदाडेवर विजय मिळवून मानाचे बक्षीस पटकावले. दुसऱ्या क्रमाकांच्या बक्षिसासाठी साकेत यादव विरुध्द प्रशांत जगताप यांच्यातील कुस्ती बरोबरीत सुटली. तिसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत सत्पाल सोनटक्केने सिद्धार्थ पंजाबवर विजय मिळविला.

मनिष रायतेने आशिष हुड्डावर विजय मिळवित चौथ्या क्रमांकाचे बक्षिस पदरी पाडले. याशिवाय अन्य कुस्त्याही नेत्रदिपक झाल्याने, आखाडा कुस्तीशौकिनांनी फुलून गेला होता. याव्यतिरिक्त अन्य लढतीही अत्यंत प्रेक्षणीय झाल्या. माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी आमदार यशवंत माने, आप्पासाहेब जगदाळे, प्रदीप गारटकर, प्रवीण माने आदी मान्यवरांनी आखाड्यास भेट देऊन खेळाडूंचा उत्साह वाढवला. प्रशांत भागवत, युवराज केचे, सुभाष दिवसे आणि तानाजी काळे यांनी कुस्त्यांचे बहारदार समालोचन केले.

भक्ती आणि उत्साहाचा संगम
यात्रेनिमित्त पळसनाथ मंदिराला फुलांची आकर्षक आरास व विद्युत रोषणाई करण्यात आली होती. बुधवारी (दि. १) सकाळी देवाची महापूजा व अभिषेक झाला, तर सायंकाळी वाजत-गाजत छबिना मिरवणूक काढण्यात आली. गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी आणि लेझीम पथकांच्या निनादात निघालेल्या या मिरवणुकीने संपूर्ण गाव भक्तिमय झाले होते. गुरुवारी (दि. २) यात्रा बाजार भरला होता, ज्यामध्ये महिला व मुलांनी खरेदीचा आनंद लुटला. यात्रा उत्सव शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी यात्रा समितीने विशेष परिश्रम घेतले. नोकरी-व्यवसायानिमित्त बाहेरगावी असलेले नागरिक व पाहुण्यांच्या उपस्थितीने पळसदेव गाव गजबजून गेले होते.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat