Saturday, 28 Nov, 5.03 am प्रभात

शीर्ष बातम्या
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर; सीरमच्या कराेनाराेधक लसीचा घेणार आढावा

पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या म्हणजे शनिवारी पुणे दौऱ्यावर असून सीरम इन्सिट्यूटमधील लस उत्पादन संबंधीचा आढावा घेतील. तसेच शनिवारी दुपारी कंपनीला भेट देऊन सद्यस्थितीचा आढावा घेतील.

ऍस्ट्राझेनेका कंपनी आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या कोरोना आजारावरील कोवीशिल्ड लसीचे उत्पादन घेणाऱ्या पुण्यातील सीरम इन्स्टिटयूट आणि जिनोव्हा बायो फार्मासिटिक्युअल्स कंपनीला पंतप्रधान नरेंद्र मोदी भेट देणार आहेत. ते शनिवारी दुपारी कंपनीला भेट देऊन सद्यस्थितीचा आढावा घेतील.

दरम्यान, मोदींच्या दौऱ्यापूर्वीच कंपनीच्या आसपासच्या भागात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. भारतीय हवाई दलाच्या विशेष विमानाने मोदी दुपारी साडेबाराच्या सुमारास लोहगाव येथील विमानतळावर दाखल होतील. तेथून हेलिकॉप्टरने सीरम इन्स्टिटयूटला जातील. पुण्यातील मांजरी भागात असलेल्या सीरम इन्स्टिटयूट आणि जिनोव्हा बायो फार्मासिटिक्युअल्स कंपनीत कोवीशिल्ड लस तयार केली जात आहे. याबाबत आढावा घेण्यासाठी उद्या पंतप्रधान मोदी येणार आहेत. यादरम्यान, सीरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पुनावाला यांच्यासह शास्त्रज्ञ आणि संशोधकांशी मोदी संवाद साधतील.

सुरक्षा यंत्रणा 'अलर्ट'

या पार्श्वभूमीवर सर्व सुरक्षा यंत्रणा 'अलर्ट' झाल्या असून, एसपीजी (स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप) व स्थानिक पोलिसांकडून सुरक्षेचा आढावा घेतला जात आहे. दिल्लीतील सुरक्षा पथके पुण्यात दाखल झाली आहेत. पंतप्रधान मोदी हे शनिवारी पुणे विमानतळावरून हेलिकॉफ्टरने सीरमकडे जाणार आहेत. त्यामुळे सुरक्षेची खबरदारी म्हणून राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेबरोबरच शहर पोलिसांनीदेखील कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शहरात तपासणी सुरू करण्यात आली आहे.

पंतप्रधानांच्या ताफ्यातील चार विशेष वाहने गुरुवारी दुपारी दिल्लीहून विशेष रेल्वेने पुणे स्थानकावर दाखल झाली. विशेष वाहनात जॅमर असलेल्या वाहनाचादेखील समावेश आहे. स्थानकावर गाड्या दाखल झाल्यानंतर पोलीस सुरक्षेत त्या रवाना करण्यात आल्या.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top