Monday, 13 Jul, 6.17 pm प्रभात

ताज्या बातम्या
पायलट यांच्याकडून बंडाचे निशाण कायम; म्हणाले.

नवी दिल्ली - राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी फडकावलेलं बंडाचं निशाण इतक्यात उतरवणार नसल्याचं स्पष्ट केलंय. 'आपल्याकडे ३० आमदारांचा पाठिंबा असून मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे अल्पमतातील सरकार चालवत आहेत' असा दावा खुद्द उपमुख्यमंत्री पायलट यांनी केल्यानंतर राष्ट्रीय राजकारणात एकच खळबळ उडाली होती.

यानंतर आज एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना पायलट यांनी, 'आज सायंकाळी राहुल गांधी यांच्याशी भेटण्याची कोणतीही योजना नाही.' असं सांगत आपण आपल्या भूमिकेवरून माघार घेणार नसल्याचे संकेत दिले.

तत्पूर्वी आज राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आमदारांची बैठक बोलवत शक्तिप्रदर्शन केले. यावेळी त्यांनी पक्षाचे १०७ पैकी १०० आमदार आपल्यासोबत असल्याचं म्हंटलं. या बैठकीमध्ये पक्षविरोधी कृत्य करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्यात यावी असा प्रस्ताव पास करण्यात आला.

एकीकडे गेहलोत यांच्या भूमिकेमुळे ते पायलट यांच्यासोबत असलेले हेवेदावे दूर करून पुन्हा एकदा राज्याचा राजकीय गाडा हाकण्यास तयार असल्याचं दिसत नाही. तर दुसरीकडे काँग्रेस पक्षश्रेष्ठी मात्र पायलट यांचे बंड मोडून त्यांना संधी देण्यासाठी अनुकूल आहेत असंच दिसतंय.

राजस्थानातील राजकीय पेचप्रसंग सोडवण्यासाठी पाठवण्यात आलेल्या रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषेदत मांडलेल्या दोन मुद्द्यांवरून पायलट यांना पक्ष पुन्हा संधी देण्यास तयार आहे हीच बाब अधोरेखित होते. सुरजेवाला यांनी, पायलट यांना चर्चेचे आवाहन करत त्यांच्यासाठी पक्षाचे दरवाजे उघडे असल्याचा सोनिया गांधी यांचा संदेश असल्याचे सांगितले होते.

मात्र सचिन पायलट यांनी राहुल गांधी यांच्याशी भेटण्याचा कोणतीही योजना नसल्याचं सांगत आपले बंड सहजासहजी मोडता येणार नसल्याचे संकेत दिले आहेत.

मुख्यमंत्री गेहलोत यांनी बोलावलेल्या बैठकीमध्ये पायलट यांच्याविरोधातील प्रस्ताव मंजूर होणे व त्यानंतर पायलट यांनी राहुल गांधी यांच्याशी भेटण्याची योजना नसल्याचं सांगणे हे पायलट व काँग्रेस दरम्यानची दरी वाढत असल्याचेच दर्शवते.

राजस्थानात काँग्रेस सरकार स्थापन झाल्यापासूनच सुरु असलेला गेहलोत-पायलट वाद टोकाचा ठरतो की काँग्रेस पायलट यांचे बंड मोडण्यात यशस्वी होते यावरच राज्यातील पुढील राजकारणाची दिशा ठरणार आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top