Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
PCMC News : महापालिका कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज! आता सेवानिवृत्तीच्या दिवशीच मिळणार पैसे; आयुक्तांचे मोठे आदेश

PCMC News : महापालिका कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज! आता सेवानिवृत्तीच्या दिवशीच मिळणार पैसे; आयुक्तांचे मोठे आदेश

PCMC News - पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सेवेतून नियत वयोमानानुसार तसेच स्वेच्छानिवृत्ती स्वीकारलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या सेवाकाळात प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि कर्तव्यभावनेतून दिलेले योगदान संस्थेच्या प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण ठरले आहे, अशा शब्दांत आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

तसेच यापुढे सेवानिवृत्त अधिकारी,कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीच्या दिवशीच सेवानिवृत्ती वेतन आदेश व देय रकमेचा लाभ देण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या. महापालिकेच्या वतीने संत तुकारामनगर येथील आचार्य अत्रे रंगमंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या सन्मान समारंभात मे २०२६ अखेर नियत वयोमानानुसार ७२ तसेच स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या १६ अशा एकूण ८८ अधिकारी व कर्मचाऱ्यांचा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

आयुक्त डॉ. सूर्यवंशी म्हणाले, पालिकेतील प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याने आपल्या कार्यकाळात जबाबदारीची जाणीव ठेवून उत्कृष्ट सेवा बजावली आहे. सेवानिवृत्तीनंतरचा काळ हा आयुष्यातील नवीन पर्व असतो. या काळात समाजकार्यात सक्रिय सहभाग घेत आनंदी, समाधानकारक आणि आरोग्यपूर्ण जीवन जगावे. तसेच कुटुंबीयांनीही त्यांना सन्मानपूर्वक वागणूक देऊन त्यांच्या योगदानाचा आदर करावा.

अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम म्हणाले, सेवानिवृत्ती ही केवळ शासकीय प्रक्रियेपुरती मर्यादित असते, मनातील सेवाभाव कधीही निवृत्त होत नाही. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आजवर जपलेली लोकसेवा, कर्तव्यनिष्ठा आणि अनुभव याचा लाभ पुढील पिढीला मिळावा. शहराच्या विकास प्रक्रियेत मार्गदर्शक म्हणून त्यांनी पुढेही योगदान द्यावे.

मे २०२६ मध्ये नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणाऱ्यांमध्ये सह शहर अभियंता माणिक चव्हाण, कार्यकारी अभियंता रविंद्र सूर्यवंशी, सहाय्यक आयुक्त राजीव घुले, राजाराम सरगर या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपायुक्त तानाजी नरळे यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी मानले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat