Monday, 26 Aug, 1.38 am प्रभात

मुख्य पान
फिलिपिन्समध्ये दहा झाडे लावली तरच पदवी प्रमाणपत्र

मनिला: सध्या आपल्याकडे महाराष्ट्रात राज्य सरकारच्या 33 कोटी वृक्षलागवडीच्या उद्दीष्टावरुन वाद सुरु आहेत. वृक्षारोपण करुन पर्यावरणाचे जतन करण्यासाठी सरकार मोहिम राबवते आहे, हे चांगलेच आहे. मात्र राज्य सरकारने फिलिपिन्स सरकारची योजना राबवणे जास्त सोयीस्कर ठरणार आहे. फिलिपाइन्स सरकार एक अनोखा कायदा तयार केला आहे. या कायद्यानुसार शाळेपासून महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी झाडे लावणे बंधनकारक असून ती लावली तरच त्यांना पदवी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. जर या नियमाची योग्य प्रकारे अंमलबजावणी झाली तर दरवर्षी 17.5 कोटी झाडांची लागवड करता येऊ शकेल.

फिलिपाइन्समध्ये सातत्याने जंगलांचा नाश होत असल्याने सरकारने हा निर्णय घेतला आहे. झाडे कापल्यामुळे गेल्या 85 वर्षात येथील एकूण 70 टक्के वन क्षेत्र कमी होऊन केवळ 30% वनक्षेत्र शिल्लक राहिले आहे. फिलिपाइन्सच्या सिनेटने गेल्या काही दिवसांपूर्वी मंजूर केलेल्या या विधेयकाला 'ग्रॅज्युएशन लिगसी फॉर द एन्व्हायर्नमेंट ऍक्‍ट' असे समर्पक नाव दिले आहे. या विधेयकाचे कायद्यात रूपांतर करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. कायदातज्ज्ञानी या विधेयकाला हवामान बदलाचा सामना करून पुन्हा हिरवाई आणण्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल असल्याचे म्हटले आहे.

सिनेटचे प्रतिनिधी गॅरी अलेजानो यांनी हे विधेयक सादर केले. या विधेयकानुसार शिक्षण, उच्चशिक्षण विभागाबरोबरच कृषी विभाग तसेच सामान्य नागरिकांनाही या कायद्याचे पालन करावे लागेल. वृक्ष लागवडीसाठी सरकार योग्य जागा शोधत आहे. मोकळ्या वनक्षेत्रासह वारसा जमीन, सैन्याची जागा, शहर तसेच ग्रामीण भागातही झाडे लावू शकतात. सर्व सरकारी संस्थांवर झाडांच्या योग्य देखभालीची जबाबदारी असेल. या संस्था विद्यार्थ्यांना झाडे उपलब्ध करून देतील.
फिलिपाइन्समध्ये दरवर्षी 1.2 कोटी विद्यार्थी पूर्व प्राथमिक, 50 लाख विद्यार्थी माध्यमिक शाळेत प्रवेश घेतात आणि 5 लाख विद्यार्थी महाविद्यालयातून पदवी घेऊन बाहेर पडतात. विद्यार्थ्यांनी दरवर्षी 10-10 झाडे लावली तर दरवर्षी 17.5 कोटी वृक्ष लागवड होईल. पर्यावरण रक्षणासाठी हे महत्त्वाचे पाऊल असेल, असे गॅरी अलेजानो यांनी सांगितले.

क्षेत्रफळाच्या तुलनेत वनक्षेत्र…

क्र.,देश,वन क्षेत्र
1,रशिया,45.40 टक्के
2,ब्राझिल,56.10 टक्के
3,कॅनडा,31.06 टक्के
4,अमेरिका,30.84 टक्के
5,भारत,23.68 टक्के
6,चीन,18.21 टक्के

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top