Dailyhunt
पिंपरी-चिंचवड महापालिकेनेच उभारले शहरात अनधिकृत फ्लेक्‍स

पिंपरी-चिंचवड महापालिकेनेच उभारले शहरात अनधिकृत फ्लेक्‍स

प्रभात 5 years ago

नागरिक, वाहनचालकांना अपघाताचा धोका

चिखली - पिंपरी-चिंचवड शहरात अधीच मोठ्या प्रमाणावर अनधिकृत फ्लेक्‍स, होर्डिंग यांचे पेव फुटले आहे. याकडे महापालिकेचा आकाशचिन्ह व परवाना विभाग दुर्लक्ष करत आहे. शहरात अनधिकृत होर्डिंग, फ्लेक्‍स उभारणाऱ्यांवर कारवाई करणारी महापालिकेलाच नियमांचा विसर पडल्याने शहरात ठिकठिकाणी अनधिकृत फ्लेक्‍स उभारले आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने 'मिळकतकर भरा आणि जप्ती टाळा' अशा अशयाचे नागरिकांना आवाहन करणारे फलक शहरातील महत्त्वाच्या चौकाचौकांत तसेच लहानमोठ्या रस्त्यांवर उभारले आहेत. तसेच विद्युत खांबांवर धोकादायकपणे लावण्यात आले आहेत.

त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. तसेच रस्त्याने वाहने चालवताना वाहनचालकांना अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे.

दिव्याखालीच अंधार
महापालिका आयुक्त यांच्या आदेशानुसार सदर फ्लेक्‍स लावण्यात आलेले आहेत. परंतु हे फ्लेक्‍स महापालिकेने निश्‍चित केलेल्या व परवानगी दिलेल्या ठिकाणीच अधिकृतरित्या लावणे गरजेचे होते. मात्र पालिका प्रशासनाने मनमानी पद्धतीने संपूर्ण शहरात विविध छोट्या-मोठ्या चौकांमध्ये बेकायदेशीररित्या फ्लेक्‍स लावले आहेत. शासनातील अधिकाऱ्यांची ही कृती म्हणजे दिव्याखाली अंधार असल्याचा प्रकार आहे. प्रशासनाचे असे बेकायदा कामकाज करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कृतीमुळे शहरातील नागरिकांच्या रहदारीला, सुरक्षेला व सौंदर्याला बाधा पोहोचलेले आहे. कायद्याची बाजू राखून सनदशीर मार्गाने पालिका प्रशासनाने काम करणे अपेक्षित आहे.

संबंधितांवर कारवाई करा
महापालिका प्रशासनाचे अशा पद्धतीने बेकायदा काम करणे योग्य नाही. 'मिळकतकर भर आणि जप्ती टाळा' अशा अशयाचे फलक महापालिकेने अनधिकृत उभारले आहेत. त्यामुळे नागरिकांना व वाहनचालकांना ये-जा करताना अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे असे अनधिकृत फलक त्वरित हटवून, असे अनधिकृत काम करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी छावा क्रांतिवीर सेना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने महापालिका आयुक्‍त राजेश पाटील यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. तसे निवेदन छावा क्रांतिवीर सेनेचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष विजय जरे यांनी दिले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat