Tuesday, 22 Oct, 11.53 am प्रभात

मुखपृष्ठ
पिंपरी विधानसभेसाठी 51.50 टक्‍के मतदान

पिंपरी - पिंपरी विधानसभेच्या निवडणुकीत सोमवारी (दि. 21) सुमारे 51.50 टक्के इतके मतदान झाले होते. काही मतदान केंद्रांवर बोगस मतदानाच्या आलेल्या तक्रारी, छायाचित्र मतदार चिठ्ठ्या (फोटो वोटर स्लिप) न मिळालेल्या मतदारांचा मतदार यादीतील नावे शोधण्यासाठी उडणारा गोंधळ असे चित्र विविध मतदान केंद्रांवर पाहण्यास मिळाले.

मतदारांची गैरसोय टाळण्यासाठी उमेदवारांकडून देखील मतदारांना स्लिप उपलब्ध करून दिल्या जात होत्या. तर, काळभोरनगर येथील स्वामी विवेकानंद प्राथमिक शाळेत ईव्हीएम मशीन काही काळ बंद पडले होते. मात्र, तेथे दुसरे ईव्हीएम मशीन बसविण्यात आले. त्यानंतर मतदान पुर्ववत सुरू झाले. पिंपरी मतदार संघामध्ये एकूण 3 लाख 53 हजार 545 इतके मतदार आहेत. त्यामध्ये 1 लाख 85 हजार 939 पुरूष तर, 1 लाख 67 हजार 600 महिला मतदार आहेत. तर, तृतीयपंथी अन्य मतदार 6 आहेत. 399 मतदान केंद्रांवर मतदान करण्याची सोय केलेली होती. त्याशिवाय, मतदान केंद्रासाठी 1 हजार 955 मतदान अधिकारी व कर्मचारी, शिपाई यांची नेमणूक केलेली होती. तसेच 10 टक्के राखीव म्हणजेच 195 कर्मचारी नियुक्त केले होते.

पिंपरी मतदारसंघातील केंद्रावर सकाळी सात वाजता मतदानाला सुरवात झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात मतदानाचा वेग हा संथ होता. केंद्रांवर तुरळक गर्दी पाहण्यास मिळाली. पावसाच्या हलकी सरी कोसळल्या. सकाळी नऊ वाजेपर्यंत फक्त 4 टक्के मतदान झाले. त्यानंतर मात्र, नागरिक हळूहळू घराबाहेर पडू लागले. नागरिकांनी रांगा लावून मतदान केले. सकाळी 11 वाजेपर्यंत 11.10 टक्के इतके मतदान झाले. त्यानंतर त्यामध्ये दर दोन तासाने सरासरी 10 टक्के इतकी वाढ होत गेली. दुपारी मतदानाचा वेग काहीसा मंदावला. दुपारी 1 वाजेपर्यंत 21.69, तर दुपारी 3 वाजेपर्यंत 31.28 टक्के इतके मतदान झाले. सायंकाळी पुन्हा मतदानासाठी रांगा लावून मतदान झाले. सायंकाळी 5 वाजेपर्यंत 42.67 टक्के इतके मतदान झाले होते. त्यामध्ये 3 तृतीयपंथीयांनीही मतदानाचा हक्क बजावला.

दरम्यान, पिंपरीतील विद्यानिकेतन सखी केंद्राशेजारी असलेल्या केंद्रामध्ये दोन तरुणांनी बोगस मतदान करण्याचा प्रयत्न केला. त्यांचे नाव ओळखपत्रातील नावाशी जुळत नव्हते. तसेच, त्यांना उमेदवारांच्या प्रतिनिधीने देखील हरकत घेतली. त्यामुळे त्यांना मतदान करण्यापासून अटकाव करण्यात आला. सायंकाळी सहा वाजेपर्यंत किती मतदान झाले, त्याची अंतिम आकडेवारी रात्री उशिरापर्यंत हाती आलेली नव्हती. दरम्यान, सरासरी 51.50 टक्के इतके मतदान झाल्याची माहिती पिंपरी विधानसभा निवडणूक कार्यालयाकडून देण्यात आली.

सखी केंद्रात वेगळा अनुभव
पिंपरी वाघेरे येथे सखी मतदान केंद्र उभारले होते. तेथे आकर्षक सजावट केली होती. लक्षवेधक रांगोळी काढली होती. केंद्रात येणाऱ्या प्रत्येक मतदारासाठी हा वेगळाच अनुभव होता. या केंद्रामध्ये केंद्राध्यक्षासह मतदान अधिकारी व कर्मचारी महिलाच होत्या. तसेच, येथे महिला पोलिसांची नियुक्ती केलेली होती.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top