Wednesday, 05 Aug, 10.33 am प्रभात

ताज्या बातम्या
पिंपरीतील मॉल, मार्केट कॉम्पलेक्‍स आजपासून होणार सुरू

पिंपरी - करोनाच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या चार महिन्यांहून अधिक काळ बंद असलेले शहरातील शॉपिंग मॉल, मार्केट कॉम्पलेक्‍स सुरू करण्यास उद्यापासून (दि.5) परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या चार ते साडेचार महिन्यांपासून बंद असलेले मॉल, मार्केट खुली होण्याचा मार्ग मोकळा झाला. मॉल आणि मार्केट सुरू होणार असली तरी थिएटर, फूडकोर्ट, रेस्टॉरंट मात्र पुढील आदेश येईपर्यंत बंदच राहणार आहे. हा आदेश महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मंगळवारी (दि.4) जारी केले आहेत.

22 मार्च रोजी करोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर आजपर्यंत शहरातील शॉपिंग मॉल, मार्केट तसेच थिएटर, फूडकोर्ट, रेस्टॉरंट बंद करण्यात आली होती. 19 मे नंतर काही प्रमाणात लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणत अनेक व्यवसाय, अस्थापना व कंपन्या सुरू करण्यास परवानगी देण्यात आली होती. अनलॉक तीनची नियमावली जाहीर करतानाही आयुक्त हर्डीकर यांनी शॉपिंग मॉल, मार्केट कॉम्पलेक्‍स तसेच थिएटर, फूडकोर्ट व रेस्टॉरंट बंद ठेवण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी जाहीर केला होता. मात्र त्यामध्ये मंगळवार दि. 4 ऑगस्टमध्ये बदल करत सुधारित आदेश जारी केला आहे.

मंगळवरच्या आदेशानुसार मॉल व मार्केट कॉम्पलेक्‍स नियममितपणे सुरू करता येणार आहेत. यासाठी सकाळी 9 ते सायंकाळी 7 ही वेळ असणार आहे, परंतु नियमावलीचे पालन आस्थापनांना करावे लागणार आहे. याशिवाय शहरातील सर्व निवासी हॉटेल, लॉजिंग या ठिकाणी असलेले रेस्टॉरंट व कॅन्टीन सुरू करता येणार आहे. हॉटेल, कॅन्टीनची सुविधा केवळ निवासी नागरिकांनाच देता येणार आहे.

शासकीय कार्यालयामध्ये 15 टक्के अथवा किमान पंधरा नागरिक यापैकी जे जास्त असेल तेवढ्या मनुष्यबळासह कार्यालये सुरू ठेवता येणार आहेत. तर खासगी अस्थापनांमध्ये दहा टक्के किंवा दहा कर्मचारी जे जास्त असेल त्यांच्या उपस्थितीत कार्यालये सुरू ठेवता येणार आहेत. पथारी, टपरी धारकांनाही प्रभाग अधिकाऱ्यांनी परवानगी घेऊन खाद्य पदार्थांची विक्री करता येईल. मात्र केवळ पार्सल सुविधाच उपलब्ध करून देता येईल.

सम-विषमचा निर्णय अधांतरी
संपूर्ण मुंबई शहरामध्ये सम-विषमचा निर्णय रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे रोज सर्व दुकाने ठरवून दिलेल्या वेळेत उघडत येतील. पिंपरी-चिंचवड शहरासाठी आज सुधारित आदेश काढताना आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सम-विषम बाबत निर्णय जाहीर केलेला नाही. विशेष म्हणजे पुणे महापालिका हद्दीमध्येही सम-विषमची अट रद्द करण्यात आले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top