Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Pimpri Chinchwad Police : खाकी वर्दीसमोर नियम हतबल! पोलिसांचा 'हा' कारनामा पाहून नेटकरी संतप्त, पाहा काय घडलं?

Pimpri Chinchwad Police : खाकी वर्दीसमोर नियम हतबल! पोलिसांचा 'हा' कारनामा पाहून नेटकरी संतप्त, पाहा काय घडलं?

Pimpri Chinchwad Police - रस्त्यावर उभे राहून सर्वसामान्य नागरिकांना वाहतूक नियमांचे धडे देणारे आणि किरकोळ चुकांवर हजारो रुपयांचा दंड वसूल करणारे पोलीस स्वतःच नियमभंग करत असल्याची धक्कादायक वास्तवता पिंपरी-चिंचवडमध्ये समोर आली आहे.

त्यामुळे जनतेसाठी एक कायदा आणि पोलिसांसाठी दुसरा अशी भावना नागरिकांमध्ये तीव्र होत आहे. विशेष म्हणजे, चुकीच्या पार्किंगवर कारवाई करणारी वाहतूक विभागाची टोइंग व्हॅनच अनेकदा झेब्रा क्रॉसिंगवर उभी राहत असल्याचे चित्र दिसत आहे.

पादचाऱ्यांसाठी राखीव जागेवर पोलिसांचे वाहनच अडथळा ठरत असेल, तर नागरिकांनी नियमांचे पालन का करावे, असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. याचबरोबर एका महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या खासगी वाहनावरील तुटलेली नंबर प्लेट आणि त्यावर ठळकपणे लिहिलेली 'पोलीस' पाटी चर्चेचा विषय ठरली आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या वाहनावर अशी स्थिती आढळली असती तर तात्काळ दंडात्मक कारवाई झाली असती.

मात्र खाकी वर्दीसमोर नियमही हतबल झाले आहेत का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. हेल्मेट सक्तीबाबत जनजागृती करणारे अनेक पोलीस कर्मचारी स्वतःच विनाहेल्मेट दुचाकी चालवत असल्याचे प्रकारही वारंवार समोर येत आहेत. नो हेल्मेट, नो एन्ट्रीचे फलक लावणाऱ्या पोलीस आयुक्‍तालयातील यंत्रणेलाच स्वतःच्या आदेशांचा विसर पडल्याचे दिसत आहे. यामध्‍ये दंडात्‍मक कारवाई आणि सेवा पुस्‍तकात नोंद करण्‍याची ताकीद दिली असतानाही पोलीसच नियमांची अंमलबजावणी करीत नसल्‍याचे वारंवार दिसून येत आहे.

दररोज नागरिकांकडून लाखो रुपयांचा दंड वसूल करणाऱ्या वाहतूक विभागाने नियमभंग करणाऱ्या स्वतःच्या कर्मचाऱ्यांवर किती कारवाई केली, याचे उत्तर मात्र अद्याप मिळालेले नाही. कायद्याचा बडगा फक्त सामान्यांसाठी आणि सवलत मात्र खाकीसाठी, अशी परिस्थिती कायम राहिली तर वाहतूक शिस्तीबाबत जनतेचा उरलेला विश्वासही संपुष्टात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आता पोलीस आयुक्त या प्रकारांवर धडक कारवाई करणार की सर्व काही नेहमीप्रमाणे दडपले जाणार, याकडे शहराचे लक्ष लागले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat