Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
PM Surya Ghar Yojana : तुमच्या रिकाम्या छतावरील 'सोलर' FD पेक्षाही जास्त परतावा देऊ शकते! उत्पन्न कसे मिळवायचे ते जाणून घ्या

PM Surya Ghar Yojana : तुमच्या रिकाम्या छतावरील 'सोलर' FD पेक्षाही जास्त परतावा देऊ शकते! उत्पन्न कसे मिळवायचे ते जाणून घ्या

PM Surya Ghar Yojana : सुरक्षित गुंतवणूक आणि हमखास परतावा म्हटले की सर्वसामान्यांचा कल बँक मुदतठेवींकडे (एफडी) असतो. मात्र, घरावरील रिकामे छतही एफडीपेक्षा अधिक परतावा देणारी गुंतवणूक ठरू शकते.

केंद्र सरकारच्या अनुदानामुळे रूफटॉप सोलर प्रणाली बसविण्याचा खर्च कमी झाला असून वीजबिलातील बचतीमुळे या गुंतवणुकीवर १५ ते २५ टक्क्यांपर्यंत वार्षिक परतावा मिळू शकतो.

सध्या बहुतांश बँका एफडीवर सरासरी ६.५ ते ७.५ टक्के वार्षिक व्याज देतात. कर वजा केल्यानंतर प्रत्यक्ष परतावा आणखी कमी होतो. त्याउलट, सौरऊर्जा प्रणालीमुळे दरमहा वीजबिलात होणारी बचत ही थेट उत्पन्नासारखीच ठरते.

3 किलोवॅट क्षमतेची सौरऊर्जा प्रणाली अनुदानानंतर साधारणपणे 1 लाख 10 हजार ते 1 लाख 20 हजार रुपयांत बसविता येते. ही प्रणाली दरमहा सुमारे ३६० ते ४०० युनिट वीज निर्मिती करते. वीजदर प्रतियुनिट ७ रुपये गृहीत धरल्यास महिन्याला २,५०० ते २,८०० रुपयांची, तर वर्षाला ३० ते ३३ हजार रुपयांची बचत होते. म्हणजेच सव्वा लाखाच्या गुंतवणुकीवर सुमारे २५ टक्के वार्षिक परतावा मिळण्याची शक्यता असते.

चार ते पाच वर्षांत खर्चाची वसुली –

सौरऊर्जा प्रणालीची आणखी एक जमेची बाजू म्हणजे तिचा 'पेबॅक पिरियड' कमी असणे. वीजबिलातील बचतीमुळे गुंतविलेली रक्कम साधारण चार ते पाच वर्षांत परत मिळते. त्यानंतरच्या सुमारे २० वर्षांच्या कालावधीत मिळणारी वीज जवळपास मोफत ठरते. त्यामुळे पुढील बचत ही निव्वळ नफा मानली जाते.

'पीएम सूर्य घर' योजनेतून मोठे अनुदान –

रूफटॉप सोलरला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारच्या 'पीएम सूर्य घर मोफत वीज योजना' अंतर्गत अनुदान दिले जाते. त्यानुसार १ किलोवॅट प्रणालीसाठी ३० हजार रुपये, २ किलोवॅटसाठी ६० हजार रुपये आणि ३ किलोवॅट किंवा त्याहून अधिक क्षमतेच्या प्रणालीसाठी कमाल ७८ हजार रुपयांपर्यंत अनुदान उपलब्ध आहे. त्यामुळे सुरुवातीची गुंतवणूक लक्षणीयरीत्या कमी होते.

२५ वर्षांचे आयुष्य, देखभालीचा कमी खर्च –

बहुतेक सौर पॅनेल्सचे आयुष्य आणि हमी कालावधी २५ वर्षांपर्यंत असतो. एकदाच केलेली गुंतवणूक दीर्घकाळ लाभ देत राहते. शिवाय, देखभाल खर्च अत्यल्प असून पॅनेल्सची नियमित स्वच्छता करणे एवढीच मुख्य गरज असते.

नेट मीटरिंगमधून अतिरिक्त फायदा –

घरात निर्माण होणारी सर्व वीज वापरली गेली नाही, तरी ती वाया जात नाही. 'नेट मीटरिंग' व्यवस्थेद्वारे अतिरिक्त वीज वीजवितरण कंपनीच्या ग्रीडमध्ये पाठविता येते. त्याबदल्यात वीजबिलात सवलत मिळते किंवा काही राज्यांमध्ये आर्थिक मोबदला देखील दिला जातो.

दीर्घकालीन गुंतवणुकीचा पर्याय –

तज्ज्ञांच्या मते, १ ते सव्वा लाख रुपयांची सुरक्षित गुंतवणूक करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी रूफटॉप सोलर हा एफडीला पर्याय ठरू शकतो. वीजबिलातील बचत, सरकारी अनुदान, दीर्घकालीन लाभ आणि पर्यावरणपूरक ऊर्जा निर्मिती या सर्व बाबी लक्षात घेतल्यास सौरऊर्जा प्रणाली ही आर्थिकदृष्ट्या फायदेशीर गुंतवणूक मानली जात आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat