Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
PMC Road Repair: पुणेकरांना खड्ड्यांपासून मिळणार दिलासा; महापालिकेची १४ कोटींच्या डांबर खरेदीला मंजुरी

PMC Road Repair: पुणेकरांना खड्ड्यांपासून मिळणार दिलासा; महापालिकेची १४ कोटींच्या डांबर खरेदीला मंजुरी

प्रभात 2 weeks ago

PMC Road Repair - शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविणे, डांबरीकरण आणि रस्त्यांच्या देखभाल- दुरुस्तीच्या कामांना वेग देण्यासाठी येरवडा येथील महापालिकेच्या हॉटमिक्स प्लँटसाठी सुमारे १४ कोटी रुपयांच्या पेट्रोलियमजन्य साहित्य खरेदीच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.

परिणामी येरवडा येथे उभारलेला नवीन हाॅटमिक्स प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास गती मिळणार आहे.

या प्रकल्पाची क्षमता प्रतितास १६० टन हाॅटमिक्स तयार करण्याची आहे. परिणामी गेल्या दोन महिन्यांपासून रखडलेल्या पावसाळ्यातील रस्ते दुरुस्तीच्या कामाला गती येणार असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली. येरवडा येथील महापालिकेचा बॅच मिक्स (हॉटमिक्स) प्लँट शहरातील १५ क्षेत्रीय कार्यालये आणि मुख्य पथ विभागाला दररोज डांबरी मिश्रणाचा पुरवठा करतो.

या मिश्रणाचा वापर खड्डे बुजविण्यासाठी, रस्त्यांची देखभाल- दुरुस्ती, तसेच रिसर्फेसिंगसाठी केला जातो. प्लँट वर्षभर दोन शिफ्टमध्ये सुरू ठेवण्यासाठी डांबर, एलडीओ, इमल्शन, रोडबॉन्ड (कोल्डमिक्स) आणि थर्मिक ऑइलचा सातत्याने पुरवठा आवश्यक असल्याचे प्रशासनाने प्रस्तावात नमूद केले होते. महापालिका प्रशासनाने यापूर्वी २०२३ मध्ये या साहित्याच्या खरेदीसाठी सुमारे १४.२९ कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया राबवली होती.

त्यानंतर २७ ऑक्टोबर २०२५ रोजीच्या स्थायी समितीच्या ठरावानुसार अधिनियमातील विशेष तरतुदीचा वापर करून उत्पादक कंपन्यांकडून थेट खरेदी करण्याचे अधिकार आयुक्तांना देण्यात आले होते. त्याच पद्धतीने पुढील दोन महिन्यांसाठी आवश्यक साहित्य थेट उत्पादकांकडून खरेदी करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

दरम्यान, येरवडा हॉटमिक्स प्लँटमध्ये पार्कर कंपनीचा नवीन बॅच मिक्स प्लँट कार्यान्वित करण्यात येत असून, त्यासाठी आवश्यक थर्मिक ऑइलची प्रथमच खरेदी करण्यात येणार आहे. डांबरी मिश्रण आवश्यक तापमानात ठेवण्यासाठी आणि यंत्रणा सुरळीत चालविण्यासाठी थर्मिक ऑइल आवश्यक असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat