Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
PMPML Tourism Bus: पुणेकरांसाठी खूशखबर! अवघ्या ५०० रुपयांत फिरा मुळशी अन् ताम्हिणी घाट; पाहा मार्ग आणि वेळ

PMPML Tourism Bus: पुणेकरांसाठी खूशखबर! अवघ्या ५०० रुपयांत फिरा मुळशी अन् ताम्हिणी घाट; पाहा मार्ग आणि वेळ

PMPML Tourism Bus - मुळशी आणि ताम्हिणी घाटातील हिरवाईने नटलेला निसर्ग, फेसाळणारे धबधबे, धरण आणि प्राचीन मंदिर स्थळांची सफर आता वातानूकुलित पीएमपी बसमधून करता येणार आहे. पर्यटकांची गरज ओळखून आणि पर्यटकांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपीएमएल) विशेष पर्यटन बससेवा क्रमांक ९ अ सुरू केली आहे.

पावसाळ्यात मुळशी, ताम्हिणी घाट परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी होते. मात्र, अनेकवेळा वाहनांच्या कोंडीमुळे या पर्यटनाचा आनंद कमी होतो आणि अधिक मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे पर्यटकांची गरज ओळखून पीएमपीचे अध्यक्ष महेश आव्हाड यांच्या निर्देशानुसार २९ जुलैपासून ही विशेष पर्यटन बससेवा सुरू करण्यात आली आहे.

सध्या शहरात सुरू असलेल्या पर्यटन बसेसना मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहता, पीएमपीने सुरू केलेली ९ अ या नवीन जलद मार्गाला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्वास पीएमपी प्रशासनाने व्यक्त केला. या नवीन विशेष बसचा प्रवास पुणे स्टेशन येथून सुरू होईल. त्यानंतर पुढे स्वारगेट, डेक्कन जिमखाना, मुळशी शिवालय मंदिर, जेटी बोटिंग,

टाटा मुळशी धरण आणि पळसे धबधबा असा निसर्गरम्य प्रवास करून बस पुन्हा डेक्कन जिमखाना व स्वारगेटमार्गे बस पुणे स्टेशन येथे परत येईल. अवघ्या ५०० रुपयांच्या तिकिटात पर्यटकांना संपूर्ण दिवसभर या निसर्गसफरीचा आनंद घेता येईल. सध्या पीएमपीएमएलच्या एकूण १३ पर्यटन मार्गांचे संचलन सुरू आहे. या नवीन मार्गासह सर्व पर्यटन बसेसचे ॲडव्हान्स बुकिंग पर्यटकांना शहरातील डेक्कन जिमखाना,

पुणे स्टेशन, स्वारगेट, कात्रज, हडपसर गाडीतळ, भोसरी बसस्थानक, निगडी आणि मनपा भवन या आठ ठिकाणी करता येईल. पावसाळी निसर्गसौंदर्याचा सुरक्षित आणि सुलभ अनुभव घेण्यासाठी पुणेकर आणि पर्यटकांनी या पर्यावरणपूरक व किफायतशीर बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पीएमपीने केले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat