Friday, 02 Oct, 4.05 am प्रभात

शीर्ष बातम्या
'पोषण माह' अभियानात महाराष्ट्र देशात प्रथम

नवी दिल्ली : राष्ट्रीय पोषण अभियानाअंतर्गत तृतीय 'पोषण माह' या विशेष मोहिमेच्या उत्कृष्ट अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र देशात अव्वल ठरले आहे.

केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाने मंगळवारी तृतीय 'पोषण माह' या विशेष मोहीम कार्यक्रमाच्या समारोपाचे आयोजन दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून केले. या कार्यक्रमात केंद्रीय महिला व बाल विकास राज्यमंत्री देबश्री चौधरी, केंद्रीय महिला व बाल विकास सचिव राम मोहन मिश्रा, विविध राज्यातील महिला व बालविकास मंत्री, वरिष्ठ अधिकारी तसेच अभियान राबविणाऱ्या विविध अशासकीय संस्था उपस्थित होत्या.

महाराष्ट्रातून महिला व बालविकास विभागाच्या सचिव आय.ए. कुंदन आणि एकात्मिक बालविकास सेवा आयुक्त इंदरा मालो उपस्थित होत्या.

7 ते 30 सप्टेंबर दरम्यान तृतीय 'पोषण माह' विशेष मोहीम देशभर राबविण्यात आली. या अंतर्गत अतितीव्र कुपोषित बालकांचा शोध घेणे, त्यांना योग्य पोषण मिळेल याचे नियोजन करणे, स्तनदा मातांमध्ये स्तनपानाविषयी जनजागृती करणे, जन्मापासून ते 1000 दिवसांपर्यंत अधिक पोषक आहाराबद्दल सांगणे, तसेच महिला आणि बालकांमधील एनिमीया कमी करण्याच्या उपायांवर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले होते.

पोषण माह अंतर्गत सर्वाधिक उपक्रम राबविणारे महाराष्ट्र हे देशात प्रथम क्रमांकाचे राज्य ठरले. कोविड-19 च्या विपरीत परिस्थितीमध्येही सर्व दिशानिर्देशांचे पालन करून राज्य शासनाने तृतीय पोषण माह मोहीम उत्कृष्टपणे राबविली आहे.

महाराष्ट्राने अशा केल्या उपाययोजना

या विशेष मोहिमेमध्ये राज्य शासनाने अतितीव्र कुपोषित बालकांची छाननी केली. त्यांना सुक्ष्म 45 पोषण आहार प्रदान करण्यात आले. अंगणवाडी सेविकांना देण्यात आलेल्या मोबाईलच्या माध्यमातून बालकांचे वजन, उंची नोंदविण्यात आली. घरोघरी जाऊन योग्य प्रकारे काळजी घेण्याबाबत पालकांना जागरूक करण्यात आले. यासह गरोदर तसेच स्तनदा मातांचा आहार, त्यांचे लसीकरण आरोग्य विभागाच्या सहायाने करण्यात आले. महिलांमध्ये आंतर बाह्य स्वच्छतेबाबत माहिती देण्यात आली, त्यांना काही समस्या असल्यास त्यांचे

समुपदेशन करण्यात आले. न्युट्री किचन गार्डन ही परिकल्पना महाराष्ट्राने दोन वर्षापूर्वीच सुरू केली असून यातंर्गत आतापर्यंत 10 हजार न्युट्री किचन गार्डन महाराष्ट्रात असल्याची माहितीही दूरदृश्यप्रणालीद्वारे आयोजित कार्यक्रमात श्रीमती कुंदन यांनी दिली.

केंद्र शासनाच्या डॅशबोर्डमध्ये सर्वाधिक कार्यक्रमांच्या नोंदी महाराष्ट्राने केल्या आहेत. या डॅशबोर्डमध्ये राज्याने 5 कोटी 38 लाख 12 हजार 326 नोंदी केल्या असून देशात महाराष्ट्र प्रथम ठरले आहे. तर उत्तर प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर आहे. पोषण माह दरम्यान सर्वाधिक सहभागी तामिळनाडू मधून सहभागी झाले तर या गटात महाराष्ट्राला दुसरा क्रमांक मिळाला आहे. महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर आणि मंत्री मंडळातील इतर सदस्यांचे मार्गदर्शन यासह काटेकोर नियोजन, अंमलबजावणी, लोकांचा तसेच अंगणवाडी सेविका, शासनाचे इतर विभाग यांचा सक्रीय सहभाग यामुळे हे यश प्राप्त करता आले अशी भावना महिला व बालविकास खात्याच्या सचिव आय.ए. कुंदन तसेच एकात्मिक बालविकास सेवा आयुक्त इंदरा मालो यांनी वेबीनारमध्ये व्यक्त केल्या.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top