Sunday, 03 Sep, 5.38 am प्रभात

महाराष्ट्र
प्रेक्षकांनी अनुभवला "चतुरंग की चौपाल'चा अप्रतिम नृत्याविष्कार

पुणे - यमन, जयजयवंती, अडाणा आणि भैरवी या चार रागांना चतुरंगात गुंफून साकारलेला अप्रतिम नृत्याविष्कार. अनेकविध भावात्मक नाट्यछटांनी न्हाऊन निघालेली नृत्य मैफल आणि रसिकांच्या उपस्थितीत मंत्रमुग्ध झालेले सभागृह. अशा वातावरणात भारतीय अभिजात संगीतातील "चतुरंफ' या संकल्पनेवर आधारित "चतुरंग की चौपाल' हा कार्यक्रम पार पडला. निमित्त होते सुप्रसिद्ध कथक नृत्यांगना गुरु शमा भाटे यांच्या नादरूप या कथक संस्थेच्या 30 व्या वर्धापन दिनाचे.
सातारा रस्त्यावरील अण्णाभाऊ साठे सभागृहात आयोजित या कार्यक्रमाने उपस्थितांना अक्षरश: खिळवून ठेवले. दिल्ली येथील कथक केंद्राच्या अध्यक्षा कमलिनी अस्थाना, पद्मश्री तालयोगी पं.सुरेश तळवलकर, नादरूपच्या अध्यक्षा आणि सुप्रसिद्ध कथक नृत्यांगना गुरु शमा भाटे आदी यावेळी उपस्थित होते.
कथक नृत्यांगना गुरु रोहिणी भाटे यांनी अनेक संस्थांच्या माध्यमातून कथक नवीन पिढीत रुजविले आहे. शमा भाटे यांनीही ही परंपरा जपत कथक या नृत्यप्रकाराचा मोठ्या प्रमाणात विस्तार केला आहे. पुणे शहरात आता हे नृत्यप्रकार रुळले आहेत. त्याला आणखी मोठ्या स्वरूपात जगासमोर आणण्यासाठी कथक केंद्राच्या वतीने घेण्यात येत असलेला कथक महोत्सव पुढील वर्षी आम्ही पुण्यात घेऊ, अशी घोषणा कमलिनी अस्थाना यांनी कार्यक्रमादरम्यान केली.
या कार्यक्रमादरम्यान केतकी शाह, अमीरा पाटणकर, रागिणी नागर, अवनी गद्रे, शिवानी करमरकर या प्रमुख नृत्यांगनांनी अन्य नर्तक- नर्तिकांच्या साथीने राग यमन, जयजयवंती, अडाणा या रागांचे चतुरंगमध्ये सादरीकारण केली. कार्यक्रमाचा शेवटी हा राग भैरवीवर आधारीत चतुरंगने झाला. या सादरीकरणामध्ये पं. जितेंद्र अभिषेकी, पं. राजन - साजन मिश्रा, पं. सुरेश तळवलकर, पं. व्ही. डी. पलुसकर यांच्या बंदिशींचाही समावेश करण्यात आला होता.
यामधून सादर झालेल्या या नृत्यप्रकारात तराना, सरगम, साहित्य आणि नृत्याचे बोल हे कार्यक्रमाचे खास वैशिष्ठ्य ठरले.या कार्यक्रमासाठी केदार पंडित यांनी संगीत दिले, तर शमा भाटे यांनी नृत्यदिग्दर्शन केले होते .
नादरूप संस्थेला येणारी नवीन पिढी आपल्या ताकदीवर आणि नावीन्याच्या मदतीने आणखी पुढे घेऊन जाईल असा विश्वास यावेळी गुरु शमा भाटे यांनी व्यक्त केला. शिल्पा भिडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top