Sunday, 15 Dec, 6.20 am प्रभात

मुखपृष्ठ
प्रेरणा: लापोडिया गावची पाणीदार कथा

दत्तात्रय आंबुलकर
'गाव करी ते राव न करी' या चपखल म्हणीचे पुरेपूर प्रत्यंतर राजस्थानच्या लापोडिया गावात प्रकर्षाने येते. लापोडिया गावाने गेली काही दशके एकत्रितपणे व जिद्दीने प्रयत्न करून आपल्या गावची पाणी समस्या कायमची कशी सोडविली हे पाहणे म्हणूनच प्रेरणादायी ठरते. पाण्याच्या समस्येवर खरा तोडगा काढण्यासाठी येथील रहिवाशांना मोठा संघर्ष करावा लागला. सुमारे 1977 पर्यंत गावात पाण्याची तीव्र टंचाई असे. दरवर्षी येणारा दुष्काळ स्थानिकांच्या पाचवीलाच पूजला होता. त्यातही एखाद्या वर्षी जर पाऊस झालाच नाही तर त्यावर्षी तर येथे पिण्याच्या पाण्याची वानवा भासायची. त्यावर्षी गावकऱ्यांना त्यातही महिलांना पिण्याचे पाणी मिळविण्यासाठी दूरवर भटकंती करून पिण्यासाठी पुरेसे पाणी मिळेलच याची शाश्‍वती नसायची.

त्याचदरम्यान मूळचा लापोडियाचा पण राज्याची राजधानी असणाऱ्या जयपूरमध्ये शिक्षण घेणाऱ्या लक्ष्मण सिंह हा युवक त्याच्या रजेदरम्यान गावी आला असता त्याला आपल्या गावातील पाण्याचे दुर्भिक्ष व त्यापोटी होणारी महिलांची दुर्दशा लक्षात आली. लक्ष्मण सिंहला यावर काहीतरी तोडगा काढणे आवश्‍यक असल्याचे जाणवले. यासाठी त्याने आपल्या समकालीन युवकांची 'ग्रामविकास नवयुवक मंडळ' नामक संघटना तयार केली. मंडळातर्फे गावच्या सर्व युवक व नागरिकांसह एक कृती-कार्यक्रम तयार केला व त्याची अंमलजावणी सुरू केली.

पाणीप्रश्‍नावरील समस्येच्या पहिल्या प्रयत्नात या मंडळाच्या युवा सदस्यांनी गावातील परंपरागत तलावाची दुरुस्ती व आणखी खोदकाम ही कामे प्रामुख्याने हाती घेतली. या प्रयत्नात सुरुवातीला मर्यादित स्वरूपात साथ मिळाली. मात्र नंतरच्या टप्प्यात गावातील युवकांचा वाढता सहभाग व त्यांच्या प्रयत्नांचे स्वरूप पाहता इतर गावकरीही या पाणी प्रयत्नात सहभागी झाले. त्याला व्यापक प्रतिसाद मिळू लागला.

या पहिल्या प्रयत्नाला यश आल्याने गावाजवळील अन्नसागर तलाव, फुलसागर तलाव, देवसागर तलाव या तलावांची खोदाई-सफाईचे काम हाती घेण्यात आले. या उपक्रमाचे नेतृत्व जरी लक्ष्मण सिंह यांच्या नवयुवक मंडळाकडे असले तरी त्याला आता पंचक्रोशीतील शेतकरी-मेंढीपालक व जनसामान्यांची साथ मिळत गेली. याच्याच जोडीला गावाजवळील छोट्या तळ्यांची पण दुरुस्ती करण्यात आल्याने गुरा-डोरांच्या पाण्याचा प्रश्‍न सोडविला गेला. या प्रयत्नांमुळे गावातील आणि पंचक्रोशीतील गावांजवळील तळ्यांमधील गाळ उपसून त्याची पाणी साठवण क्षमता खूपच वाढली. नंतरच्या पावसाळ्यापासून टप्प्याटप्प्याने त्याचे प्रत्यंतर येऊ लागले. पावसाच्या पाण्याची नैसर्गिक साठवण संबंधित गावतळ्यात होऊ लागली. सुमारे 3 वर्षांमध्ये तलावांमध्ये आवश्‍यक तेवढे पाणी मिळू लागलेच शिवाय गुरांच्या पाण्याची समस्या कायमस्वरूपी निकाली लागली.

पाणी प्रश्‍नावर यशस्वी तोडगा शोधल्यानंतर लक्ष्मण सिंह व त्यांच्या ग्रामविकास नवयुवक मंडळाने गावकऱ्यांच्या सहकार्याने गो-वन व वृक्षसंरक्षणाचा नवा संकल्प सोडला. या प्रयत्नांतून केवळ लापोडियाच्या गावठाण आणि वनक्षेत्रात सुमारे लाखांवर वृक्षांची लागवड- जपणूक करण्यात आली असून गुरांच्या चाऱ्यासाठी गो-वन संरक्षण यशस्वीपणे करण्यात आले आहे. आज लापोडियाचे गावकरीच नव्हे तर गो-धन पण पूर्णपणे समाधानी आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top