Pune Accident - शहरात वेगवेगळ्या अपघातांत दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. एनडीए रस्ता, संगमवाडी भागात अपघाताच्या घटना घडल्या. एनडीए रस्त्यावर भरधाव मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
या प्रकरणी मोटार चालकाविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला. राजू नारायण चव्हाण (वय ३१, रा. शिंदे बिल्डींग, कोंढवे-धावडे, एनडीए रस्ता) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.
या प्रकरणी मोटार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत चव्हाण यांची पत्नी पूनम (वय २७) यांनी उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चव्हाण दाम्पत्य मूळचे यवतमाळ जिल्ह्यातील निमर्डा गावचे रहिवासी आहेत. राजू चव्हाण हे खासगी ठिकाणी नोकरी करतात. गुरुवारी (२८ मे) दुपारी दोनच्या सुमारास दुचाकीस्वार राजू चव्हाण हे कामावरून घरी निघाले होते.
त्या वेळी एनडीए रस्त्यावर उत्तमनगर परिसरात भरधाव मोटारीने दुचाकीस्वार चव्हाण यांना धडक दिली. अपघातात चव्हाण गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सहायक पोलीस निरीक्षक मिसाळ तपास करत आहेत. भरधाव मोटारीच्या धडकेत ऑनलाइन खाद्यपदार्थ पोहचविणाऱ्या एका दुचाकीस्वार कामगाराचा (डिलिव्हरी बाॅय) मृत्यू झाल्याची घटना संगमवाडी परिसरात घडली. (Pune Accident)
प्रेमनाथ रामकृष्ण वानखेडे (वय ५२, रा. सिद्धी टाॅवर्स, दापोडी) असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे. याबाबत वानखेडे यांचा मुलगा करण ( ३०) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी एका मोटार चालक महिलेविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेमनाथ वानखेडे हे डिलिव्हरी बाॅय' म्हणून काम करीत होते.
दुचाकीस्वार वानखेडे हे संगमवाडी परिसरातून निघाले होते. त्या वेळी खासगी आराम बस थांब्याजवळ भरधाव मोटारीने त्यांना धडक दिली. उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलीस उपनिरीक्षक काळे पुढील तपास करीत आहेत.

