Pune : गुरुपौर्णिमेनिमित्त कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टच्या वतीने दत्त मंदिरात दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम आणि भक्तिमय उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. आकर्षक फुलांची सजावट, मंत्रोच्चार आणि दत्तनामाच्या गजराने मंदिर परिसर दिवसभर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता.
दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
गुरुपौर्णिमा महोत्सवानिमित्त सकाळी ७ ते १० आणि दुपारी ११ ते ३ या वेळेत दत्त यागाचे आयोजन करण्यात आले. याचवेळी दत्त अभिषेकही संपन्न झाला. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण आणि संसदीय कार्यमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या शुभहस्ते दुपारची महाआरती पार पडली. तर सायंकाळी अभिनेत्री तेजस्विनी पंडित आणि स्नेहल प्रवीण तरडे या दाम्पत्याच्या शुभहस्ते महाआरती करण्यात आली. रात्री १० वाजता पारंपरिक पालखी सोहळ्याने गुरुपौर्णिमा महोत्सवाची सांगता झाली.
यंदाच्या गुरुपौर्णिमा महोत्सवानिमित्त दत्त मंदिरात आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांची सजावट करण्यात आली होती. मंदिर परिसरात दिवसभर दत्तनामाचा गजर, धार्मिक विधी आणि भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळाले. पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. सुव्यवस्थित नियोजनामुळे भाविकांनी शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने श्री दत्तांचे दर्शन घेतले.
यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष पुनीत बालन, कार्यकारी विश्वस्त राजू बलकवडे, उपाध्यक्ष ॲड. विवेक भरगुडे व वर्षा थोरवे, खजिनदार ॲड. सुरज थोरात, उत्सव प्रमुख नितीन पंडित, उप-उत्सव प्रमुख मनीषाताई खेडेकर, तसेच विश्वस्त डॉ. पराग काळकर आणि महेंद्रशेठ गाडवे उपस्थित होते.

