Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
pune : दोन कोटी दंडाचा धाक अन् दहा लाखांची मागणी!

pune : दोन कोटी दंडाचा धाक अन् दहा लाखांची मागणी!

शिवाजीनगर कार्यालयातील तलाठी व कोतवालाविरुद्ध गुन्हा व्यावसायिकाला दोन कोटींच्या दंडाची भीती दाखवत मागितली लाच
सेनापती बापट रस्त्यावरील खोदकाम प्रकरण
एसीबीच्या पडताळणीत लाचेची मागणी निष्पन्न

Pune: सेनापती बापट रस्त्यावरील व्यावसायिक प्रकल्पाच्या खोदकाम प्रकरणात दोन कोटी रुपयांच्या दंडाची भीती दाखवत १० लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी शिवाजीनगर तलाठी कार्यालयातील तलाठी आणि कोतवाल यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी आश्विनी दत्तात्रय कोकाटे (३७, तलाठी, शिवाजीनगर तलाठी कार्यालय) आणि महेश मधुकर मुंढे (३०, कोतवाल) यांच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, १९८८ च्या कलम ७ व १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे ३७ वर्षीय खोदकाम कंत्राटदार असून, त्यांच्या फर्ममार्फत सर्व्हे क्रमांक ९६७, सेनापती बापट रोड येथे व्यावसायिक इमारतीच्या पायाचे खोदकाम सुरू होते.

या कामाचा पंचनामा तलाठी आश्विनी कोकाटे यांनी केला. त्यावेळी ३२०० ब्रास अतिरिक्त खोदकाम झाल्याचे सांगून त्यावर सुमारे दोन कोटी रुपयांचा दंड होऊ शकतो, अशी भीती तक्रारदाराला दाखविण्यात आली. तसेच, तहसीलदारांकडे ‘निल पंचनामा’ अहवाल सादर करण्यासाठी १० लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. याबाबत तक्रारदाराने १५ जून २०२६ रोजी एसीबीकडे तक्रार दाखल केली.

त्यानंतर १६ जून रोजी एसीबीने मागणी पडताळणी केली असता, तलाठी कोकाटे यांनी १० लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे आणि ती रक्कम कोतवाल महेश मुंढे यांच्याकडे देण्यास सांगितल्याचे निष्पन्न झाले.

तसेच, कोतवाल मुंढे यांनी लाचेची रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शवून या मागणीस प्रोत्साहन दिल्याचेही पडताळणीत स्पष्ट झाल्याचे एसीबीने म्हटले आहे. या प्रकरणी ४ ऑगस्ट रोजी सायंकाळी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक आसावरी शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat