Pune Hooch Tragedy - पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरात विषारी दारू प्राशनामुळे झालेल्या मृत्यूंच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कठोर पावले उचलत पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभागातील एकूण २१ अधिकारी व कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
हडपसर, दापोडी आणि फुगेवाडी परिसरात विषारी दारू सेवनामुळे आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत.
काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. या घटनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेत दोषींवर कठोर कारवाईचे निर्देश दिल्यानंतर संबंधित यंत्रणांनी जबाबदारी निश्चित करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू केली. या प्रकरणात निष्काळजीपणा आणि अवैध दारू विक्रीकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवत पुणे व पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील आठ अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.
तसेच, राज्य उत्पादन शुल्क विभागातील तीन निरीक्षक, सहा दुय्यम निरीक्षक आणि चार कर्मचाऱ्यांसह एकूण १३ जणांना निलंबित करण्यात आले आहे. दरम्यान, हडपसर परिसरातील विषारी दारू मृत्यूप्रकरणी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले,
सहायक पोलीस निरीक्षक हसीना शिकलगार आणि पोलीस उपनिरीक्षक हसन मुलानी यांना निलंबित केले आहे. या अधिकाऱ्यांकडून कर्तव्यात हलगर्जीपणा झाल्याचे तसेच परिसरातील अवैध दारू व्यवसायावर प्रभावी नियंत्रण ठेवण्यात अपयश आल्याचे प्राथमिक चौकशीत आढळून आले आहे.

