Dailyhunt
पुणे जिल्हा: शिक्षकांना कामावर रुजू होण्याचे आदेश

पुणे जिल्हा: शिक्षकांना कामावर रुजू होण्याचे आदेश

प्रभात 5 years ago

पुणे -करोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने राज्यातील शाळांमध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची 50 टक्‍के उपस्थिती बंधनकारक करण्याचा निर्णय राज्य शासनाने गुरुवारी घेतला. शाळा तुर्तास बंद राहतील. परंतु, ऑनलाइन व ऑफलाइन शिक्षणासंबंधित कामकाजासाठी तत्काळ कामावर रुजू होण्याचे आदेश दिले आहेत. करोनाचा शैक्षणिक संस्थांमध्ये फैलाव होण्याची शक्‍यता आहे.

त्यामुळे शाळा सुरू करण्यास परवानगी दिलेली नाही. परंतु, विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये यासाठी ऑनलाइन शिक्षणाला परवानगी दिली आहे. विद्यार्थी विविध पर्यायाच्या माध्यमातून ऑनलाइन शिक्षण घेत आहेत. या कामकाजासाठी 50 टक्‍के शिक्षकांना शाळेत उपस्थित राहावे लागणार आहे.

याबाबतचे परिपत्रक उपसचिव राजेंद्र पवार यांनी काढले.

शिक्षकांना केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय व शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाच्या 15 जून 2020 रोजीच्या परिपत्रकाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे लागेल. जे शिक्षक गाव तथा शहरापासून प्रवास करून येतात, त्यांनी शक्‍यतो सार्वजनिक वाहतूक व्यवस्था न वापरता वैयक्‍तिक वाहन वापरावे. जे शिक्षक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करतात त्यांनी मास्क घालण्याची, शारिरीक अंतर पाळण्याची विशेष काळजी घ्यावी.

शाळा सुरू झाल्यानंतर पालकांच्या लेखी संमतीनेच मुलांना शाळेत प्रवेश द्यावा. कोविड-19 साठी सध्या वापरात असलेल्या शाळांमध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना प्रवेश देण्यापूर्वी शाळेचे किमान दोन ते तीन वेळा निर्जंतुकीकरण करावे.

शिक्षकांची बायोमेट्रीक हजेरी ऐवजी स्पर्शविरहित हजेरीची पर्यायी व्यवस्था करावी, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची शाळेच्या सर्व प्रवेशद्वारांवर कोविड-19 च्या लक्षणांसदर्भात उपकरणांद्वारे तपासणी करावी. मास्कचा वापर करणे अनिवार्य आदी अनुषंगाने उपक्रमांचे वेळापत्रक व बैठक व्यवस्थेची नियोजन करण्याच्या सूचनांचा समावेश आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat