Sunday, 22 Nov, 9.04 am प्रभात

शीर्ष बातम्या
पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात उद्यापासून शाळा सुरू, पण.

पुणे - जिल्ह्यातील नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सोमवारपासून सुरू होणार आहे. शाळेतील सर्व शिक्षकांची करोना चाचणी पूर्ण झाली असेल आणि सर्व शासनाच्या नियमाची पूर्तता केलेल्या शाळा सुरू होतील. मात्र, ज्या शाळेतील शिक्षकांची करोना चाचणी अद्याप व्हायची आहे, अशा शाळा टप्प्याटप्प्याने सुरू केल्या जाणार आहेत, अशी माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. गणपत मोरे यांनी दिली.

शाळा सुरू करण्यासंदर्भात शिक्षणाधिकारी मोरे यांनी जिल्ह्यातील 558 मुख्याध्यापकांची बैठक ऑनलाइनद्वारे शनिवारी घेतली. याबाबत राज्य शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांवर विस्तृत्व चर्चा झाली. त्यानुसार संस्थांना विश्वासात घेऊन शाळा सुरू करण्याचे आदेश शिक्षणधिकाऱ्यांनी मुख्याध्यापकांना दिले.

'गेल्या तीन-चार दिवसांपासून शाळा सुरू करण्याविषयी चर्चा होत आहे. त्यामुळे काही शाळांनी त्यादृष्टीने तयारी केली आहे. अशा शाळा सुरू करण्यास हरकत नाही. मात्र, ज्या शाळांतील शिक्षकांची करोना चाचणी अजून झालेली नाही. त्या शाळांत सर्व सुविधा अद्याप उपलब्ध नसतील, त्यांना सर्व बाबींची पूर्तता केल्यानंतर शाळा सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यात येत्या सोमवारी किती शाळा सुरू होतील, त्याची माहिती स्पष्ट होईल,' असेही डॉ. मोरे यांनी सांगितले.

पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघटनाचे अध्यक्ष हरिश्चंद्र गायकवाड म्हणाले, 'ज्या शाळेतील शिक्षकांची चाचणी पूर्ण झाली नाही, त्यांनी चाचणी होऊन अहवाल येईपर्यंत शाळा सुरू करू नये, असे शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. सध्या तालुकास्तरावर करोना चाचणी करण्याची क्षमता कमी आहे. त्यामुळे सर्व शाळेतील शिक्षकांची करोनाची चाचणी पूर्ण होण्यास वेळ लागेल. त्यानंतर त्यांनी शाळेत येणे आवश्यक आहे. तसेच इयत्ता पाचवी ते आठवीतील शिक्षकांना कोणतीही सुटी नसेल आणि उपस्थितीचे बंधन नाही. मात्र गरज भासेल, तेव्हा ते शाळेत उपलब्ध होणे आवश्यक आहे.'

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top