Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Pune: खड्ड्यांवरून पथविभागाची महापालिका आयुक्तांकडून झाडाझडती

Pune: खड्ड्यांवरून पथविभागाची महापालिका आयुक्तांकडून झाडाझडती

प्रभात 3 weeks ago

दुरुस्ती होत नसल्याने अधिकाऱ्यांची खरडपट्टी

Pune: शहरातील खड्ड्यांवरून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असताना महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी मंगळवारी पथ विभागाची झाडाझडती घेतली. रस्त्यावरील खड्ड्यांची दुरुस्ती होत नसल्याने त्यांनी अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली.

शहराच्या विविध रस्त्यांवर खड्डे पडल्याने नागरिकांच्या तीव्र संतापाचा सामना महापालिकेला करावा लागत आहे. याविषयी लोकप्रतिनिधींनीही प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत. एवढेच नव्हे मुख्यसभेतही चर्चा झाली आहे. असे असताना तक्रारींचा पाढा काही कमी होत नाही.

पथ विभागाचा कारभार ढिसााळ असल्याची टिपण्णी करत खड्डे बुजवण्यासाठी तातडीने मिशन मोडवर काम करा, आणि लवकरात लवकर खड्डे बुजवा, असा आदेशवजा दमच आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिला.

बैठकीत आयुक्तांनी रस्त्यांवर एवढे खड्डे कसे पडले, असा सवाल अधिकाऱ्यांना केला. त्यावर शहरात विविध विकासकामे तसेच कंपन्यांकडून खोदकाम झाल्याने खड्डे वाढल्याचे उत्तर पथ विभागाने दिले.

खोदकामानंतर डांबरीकरण नीट झाले नसल्याने पुन्हा खड्डे पडले आहेत. तसेच विविध विभागांमध्ये समन्वय नसल्यानेही खड्डे बुजवण्याचे आणि खोदाई कामे नीट झाली नसल्याची कबुली आयुक्तांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली. यावेळी प्रजित नायर आणि ओमप्रकाश दिवटे हे दोघेही अतिरिक्त आयुक्त उपस्थित होते.

यंदा विविध कंपन्यांना, तसेच पालिकेच्या विभागांना खोदकामाची परवानगी दिली होती. इंधनटंचाईच्या काळात एमएनजीएलला थेट खोदकामाची परवानगी दिली होती. या खोदकामांनंतर रस्त्यावरील खड्डे नीट बुजवून रस्ता समपातळीत केला नाही. त्यातच अनेक रस्त्यांवर पावसाळी गटारे नसल्याने साचलेले पाणी रस्त्यात मुरून रस्ते खचले आहेत, असे आयुक्तांनी सांगितले.

गेल्या काही दिवसात कोल्डमिक्स, हॉटमिक्स तसेच अन्य तंत्रज्ञान वापरून आठ हजार चौरस मीटर क्षेत्रफळातील खड्डे बुजवण्यात आले आहेत. पाऊस असेल तर कोल्डमिक्स आणि पाऊस नसेल तर हॉटमिक्स आणि अन्य गोष्टी वापरून खड्डे बुजवले जात आहेत, असा दावा अतिरिक्त आयुक्त दिवटे यांनी केला.

दरम्यान, क्षेत्रीय कार्यालयांना त्यांच्या हद्दीतील खड्डे बुजवण्याची जबाबदारी दिली होती. मात्र, त्यांच्याकडून ही जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडली जात नसल्याचे दिसून आले आहे. काही क्षेत्रीय कार्यालयात खड्डे दुरुस्तीच्या कामाच्या निविदाही मान्यतेच्या प्रतिक्षेत आहेत. यामध्ये दोषी असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे आयुक्तांनी सांगितले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat