Wednesday, 05 Aug, 9.40 am प्रभात

ताज्या बातम्या
'पुणे -नाशिक मार्ग वेळेत पूर्ण करू'

प्रकल्पात चिनी उत्पादने व सेवा वापरणार नाही

पुणे - पुणे-नाशिक सेमी हायस्पीड डबल लाइन रेल्वे प्रकल्प हा राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पातून प्रवासी सेवांसह पुणे, नाशिक आणि अहमदनगर या जिल्ह्यातील कृषी उत्पादने आणि मालवाहतुकीला गती मिळणार आहे. या प्रकल्पासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही. विक्रमी वेळेत हा प्रकल्प करू. त्याचबरोबर सध्याच्या भूसंपादनाच्या प्रचलित कायद्याप्रमाणे बाधित शेतकऱ्यांना मोबदला दिला जाणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. अत्यंत कमी खर्चात पूर्ण होणाऱ्या या प्रकल्पामुळे पुणे-नाशिक प्रवासाच्या वेळेत मोठी बचत होणार आहे. अवघ्या पावणे दोन तासात हे अंतर कापले जाणार आहे, अशी माहिती पवार यांनी दिली.
मंत्रालयामध्ये महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्‍चर डेव्हलपमेंट

कॉर्पोरेशन लिमिटेडने (महारेल) पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचे सादरीकरण पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत करण्यात आले. यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कामगारमंत्री दिलीप वळसे-पाटील, परिवहनमंत्री अनिल परब, परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील, खासदार डॉ. अमोल कोल्हे, खासदार हेमंत गोडसे, आमदार दिलीप मोहिते-पाटील, अशोक पवार, चेतन तुपे, सदाशिव लोखंडे, डॉ. किरण लोहमटे, सरोज आहिरे आदी लोकप्रतिनिधी तसेच महारेलचे महाव्यवस्थापक, वित्त, नियोजन, महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या मार्गाची प्रतिक्षा आहे.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, पुणे आणि नाशिक ही दोन शहरे औद्योगिक, कृषी विकासात अव्वल आहेत. या दोन स्मार्ट सिटीला जोडण्यासाठी पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प उपयुक्त ठरणार आहे. या प्रकल्पामुळे पुणे, अहमदनगर आणि नाशिक या तिन्ही जिल्ह्यातील पर्यटन, शिक्षण, शेती, व्यवसाय, उद्योग क्षेत्रांच्या विकासाला गती मिळणार आहे. त्यांचबरोबर या रेल्वेमुळे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. या मार्गावरील रेल्वेस्थानकात बाधित प्रकल्पग्रस्तांसह स्थानिकांना व्यवसायासाठी स्टॉल देताना प्राधान्य दिले जाणार आहे. या प्रकल्पाच्या कामातही स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सूचना विचारात घेऊन त्यांच्या सहकार्याने हा प्रकल्प तातडीने मार्गी लावण्यात येणार आहे. चिनी उत्पादने किंवा सेवा उपयोगात आणल्या जाणार नाहीत, अशी माहितीही उपमुख्यमंत्री पवार यांनी दिली.

ठळक वैशिष्ट्ये
- 235 किलोमीटर लांबीचा रेल्वे मार्ग
- रेल्वे मार्ग पुणे, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातून जाणार.
- रेल्वेचा 200 किलोमीटर प्रति तास वेग, पुढे हा वेग 250 कि.मी. पर्यंत वाढविणार.
- पुणे-नाशिक अंतर अवघ्या पावणेदोन तासात कापणार.
- पुणे-नाशिक दरम्यान 24 स्थानकांची आखणी.
- 18 बोगदे, 41 उड्डाण पूल, 128 भूयारी मार्ग प्रस्तावित.
- रेल्वे स्थानकात प्रकल्पबाधितांसह, स्थानिकांना व्यवसायासाठी प्राधान्य.
- प्रकल्पाच्या खर्चात 60 टक्के वित्तीय संस्था, 20 टक्के राज्य सरकार, 20 टक्के रेल्वेचा वाटा.
- विद्युतीकरणासह एकाचवेळी दोन्ही रेल्वे लाइनचे बांधकाम होणार.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top