Friday, 11 Jun, 2.29 pm प्रभात

मुखपृष्ठ
Pune : न्यायालयाने जामीन नाकारला तरी कारागृहाने आरोपी सोडला

पुणे (संजय कडू) - पिंपरी-चिंचवड शहरात दाखल असलेल्या 12.5 कोटीच्या कर्ज प्रकरणातील संशयीत आरोपीची येरवडा कारागृह प्रशासनाने चुकून सुटका केली. ही बाब लक्षात आल्यावर प्रशासनाची मोठी धावपळ उडाली होती. त्यांनी आरोपीच्या नातेवाईक व वकिलांमार्फत त्याच्यापर्यंत निरोप पोहचवला. यानंतर तो स्वत:हून कारागृहात परतला. कारागृह प्रशासनाचा हा हलगर्जीपणा गंभीर असल्याने राज्य तुरुंग विभागाने चौकशीचे आदेश दिले आहेत.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तेजस मोरे, असे संशयीत आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर 12.5 कोटी रुपयांच्या कर्ज फसवणूक प्रकरणाचा आरोप आहे. त्याने न्यायालयाकडे जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, दि. 2 जूनला त्याचा जामिन अर्ज फेटाळण्यात आला होता. त्याचा जामिन अर्ज फेटाळल्याचे न्यायालय प्रशासनाकडून कारागृहाला कळवण्यात आले होते. मात्र, इतर आरोपींची सुटका करताना त्यांच्यासोबत मोरे याचीही सुटका करण्यात आली. ही बाब कारागृह प्रशासनाच्या लक्षात येताच त्यांनी मोरे याचे नातेवाईक, इतर ओळखीच्या व्यक्ती आणि वकिलांशी तातडीने संपर्क साधून मोरे याच्यापर्यंत कारागृह प्रशासनाचा निरोप पोहचला. निरोप मिळताच मोरे पुन्हा कारागृहात परतला.

मोरे हा मुळचा नाशिकचा आहे. पिंपरी पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (ईडब्ल्यूई) यावर्षी फेब्रुवारी महिन्यात पिंपरी पोलीस ठाण्यात 12.5 कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणीत अटक केली होती. सध्या तो न्यायालयीन कोठडीत होता. ईओडब्ल्डूच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मालमत्ता गहाण ठेवण्याच्या बदल्यात कर्ज मिळवून सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकेची फसवणूक झाली होती. ईओडब्लूने या प्रकरणात यापूर्वीच आरोपपत्र सादर केले आहे.

'कारागृह प्रशासनाने न्यायालयाची ऑर्डर वाचताना गफलत केली असावी. मात्र, आमच्या क्लाएंटशी कारागृह प्रशासनाने संपर्क साधताच तो स्वत:हून कारागृहात हजर झाला आहे', अशी माहिती मोरे यांचे वकील अॅड. प्रविण चव्हाण यांनी दिली.

'न्यायालयाने जामीन नाकारला असताना कारागृहातून कैद्याला सोडण्यात आले. ही गंभीर बाब आहे. ही घटना कशी घडली याचा तपास करु तसेच, कर्मचाऱ्यांकडून ऑर्डरचा चुकीचा अर्थ लावण्यात आला किंवा इतर कसे हेही आम्ही तपासू. करोना संसर्ग पसरल्यामुळे हाय पाॅवर कमिटीने (एचपीसी) दिलेल्या निर्देशानुसार, कैद्याने अंतरिम जामिनासाठी मे महिन्यात न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मात्र, न्यायालयाने हा गुन्हा गंभीर असल्याचे सांगून दि. 2 जूनला जामीन अर्ज फेटाळला होता,' अशी माहिती अतिरिक्त पोलीस महासंचालक (कारागृह) सुनील रामानंद यांनी दिली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top