Dailyhunt
Pune Water Park : पाण्यातील मजा ठरली जीवघेणी; वॉटर स्लाइड अपघातात महिलेचे आयुष्य उद्ध्वस्त, नेमकं काय घडलं?

Pune Water Park : पाण्यातील मजा ठरली जीवघेणी; वॉटर स्लाइड अपघातात महिलेचे आयुष्य उद्ध्वस्त, नेमकं काय घडलं?

Pune Water Park : पुणे जिल्ह्यातील मोरोची चिंचोली येथे घडलेल्या एका दुर्देवी प्रकाराने एका कुटुंबाचे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकले आहे. सहलीचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या एका महिलेवर वॉटर पार्कमधील दुर्घटनेमुळे गंभीर संकट कोसळले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जय मल्हार कृषी पर्यटन केंद्रे येथे वॉटर स्लाइडवरून घसरताना पाण्याची पातळी अपुरी असल्याने 37 वर्षीय महिलेचा गंभीर अपघात झाला. या घटनेत तिच्या पाठीच्या कण्याचे चार मणके तुटले असून, त्यामुळे तिच्या शरीराचा अर्धा भाग निकामी झाला आहे. या प्रकरणी पर्यटन केंद्राचा मालक आणि व्यवस्थापकाविरोधात शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं काय घडलं? Pune Water Park

अश्विनी संदीप नप्ते (वय 37, रा. करंदी, ता. शिरूर) असे या महिलेचे नाव असून, त्या आपल्या कुटुंबासोबत सहलीसाठी येथे आल्या होत्या. वॉटर स्लाइडचा अनुभव घेत असताना त्या वेगाने खाली येत होत्या. मात्र, स्लाइडच्या शेवटी पाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने त्या जोरात आपटल्या आणि गंभीर जखमी झाल्या.

अपघातानंतर त्या बेशुद्ध पडल्या. घटनास्थळी गोंधळ उडाला. या ठिकाणी तातडीची वैद्यकीय सुविधा किंवा रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. अखेरीस त्यांना खाजगी रुग्णवाहिकेतून रुग्णालयात हलवण्यात आले.

तपासणीत धक्कादायक माहिती

डॉक्टरांच्या तपासणीत धक्कादायक माहिती समोर आली. महिलेच्या पाठीचे चार मणके तुटल्याचे निष्पन्न झाले असून, या गंभीर दुखापतीमुळे त्यांना अर्धांगवायूचा सामना करावा लागत आहे. एका क्षणात आनंदाची सहल आयुष्यभराच्या वेदनेत बदलली आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.

या घटनेमुळे वॉटरपार्कमधील सुरक्षेच्या उपाययोजनांवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पर्यटकांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे. प्रशासनाने याची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे. Pune Water Park

Swara Bhaskar: स्वरा भास्कर पुन्हा चर्चेत; 'महाभारत'पासून 'जौहर'पर्यंत वक्तव्यांवरून वादांची मालिका

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat