Sunday, 22 Nov, 9.04 am प्रभात

शीर्ष बातम्या
"राजकारणात आल्यावर कळाले, शरद पवार छोटे नेते आहेत"

पुणे - राजकारणात आल्यावर समजले शरद पवार मोठे नेते नसून, छोटे नेते आहेत. त्यांचा अभ्यास नसतो, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ज्येष्ठ नेते व खासदार शरद पवार यांच्यावर केली. त्याचवेळी मात्र, देवेंद्र फडणवीस अभ्यासू नेते असल्याचे पाटील यांनी सांगितले.

पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातील भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ शनिवारी पुण्यात आयोजित ओबीसी मेळाव्यात पाटील बोलत होते. देवेंद्र फडणवीस हे अत्यंत अभ्यासू नेते असल्याचे सांगत पाटील म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, याची काळजी त्यांनी घेतली आहे.

त्यासाठी त्यांनी कायद्याचा बारकाईने अभ्यास केला. मराठा समाज ओबीसीमध्ये घुसूच शकत नाही, याची व्यवस्था केली आहे. मात्र, राजकारणासाठी काही लोक आरक्षणाच्या मुद्द्यावरून समाजामध्ये आंतर निर्माण करण्याचे काम करत आहेत. आरक्षणाबाबत माहितीच नाही, अशी टीका पाटील यांनी केली.

पदवीधर आणि शिक्षक या दोन्ही जागा जिंकण्यासाठी जे-जे करावे लागेल ते-ते करा. ही निवडणूक एकतर्फी असल्याने आपला विजय निश्चित आहे. राज्यातील विधान परिषदेच्या सर्वच्या सर्व जागा जिंकल्यावरच राज्यातील महाभकास आघाडीला नागरिकांच्या मनात किती रोष आहे, हे कळेल. विरोधकांना केवळ पराभवाचीच भाषा कळते. हिंमत असेल तर शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने एकटे एकटे लढावे, मग त्यांना भाजप काय आहे, हे कळेल, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top