Wednesday, 05 Aug, 10.00 am प्रभात

ताज्या बातम्या
राममंदिर पायाभरणीसाठी रांका ज्वेलर्सतर्फे चांदीची वीट अयोध्येला रवाना

पुणे - कोट्यवधी भारतीयांचे श्रद्धास्थान असणाऱ्या अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या पायाभरणीच्या बांधणीसाठी पुण्यातील रांका ज्वेलर्सने चांदीची वीट तयार केली असून, ती पुण्यातून अयोध्येकडे पाठवण्यात येत आहे. मानव रांका यांच्या कल्पनेतून ती साकारण्यात आली आहे.

ही वीट 99.99 टक्के शुद्ध असून, तिच्यावर 'जय श्रीराम' अशी अक्षरे लिहिली आहेत. याशिवाय विटेवर मोती, पोवळे, लसण्या, पुष्कराज, गोमेद, माणिक, हिरा, पाचू, नीलम अशी नवग्रहांची रत्ने देखील जडवण्यात आलेली आहेत. भारतीय संस्कृतीमध्ये हजारो वर्षांपासून नवरत्नांचे महत्त्व आहे.

नवग्रहांच्या शांतीसाठी आणि विशेष लाभांसाठी या नवरत्नांचे सहाय्य घेतले जाते. ज्यामुळे विघ्ने दूर होऊन शुभफले मिळतात, असे ज्योतीषशास्त्र देखील सांगते. अशा या विटेचे वजन 1011 ग्रॅम असून, ही वीट 2 कारागिरांनी 2 दिवसांत निर्माण केलेली आहे.

फक्त पुणेकरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र आणि देशासाठी अभिमानास्पद असणारी ही कामगिरी रांका ज्वेलर्सच्या हातून घडल्याचे सार्थ समाधान रांका ज्वेलर्सचे मानव रांका व संपूर्ण रांका परिवाराला वाटत आहे. श्रद्धा आणि पावित्र्याचा हा सुंदर आविष्कार घडविण्याचे भाग्य मिळाल्याबद्दल आनंद वाटत असल्याचे रांका म्हणाले. दरम्यान, या मंदिराच्या उभारणीसाठी भारतीय जनता पक्ष, पुणे शहर आणि स्व. माजी सैनिक दरोगा सिंग यांच्या स्मरणार्थ नवीन सिंग यांच्या परिवारातर्फे चांदीची वीट अयोध्येला पाठवण्यात आली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top