Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Rashmika Mandanna: "मला वाटलं कुणालाच कळणार नाही."; रश्मिका मंदानाने सांगितली दुखापतीची कहाणी

Rashmika Mandanna: "मला वाटलं कुणालाच कळणार नाही."; रश्मिका मंदानाने सांगितली दुखापतीची कहाणी

Rashmika Mandanna: अभिनेत्री रश्मिका मंदाना सध्या तिच्या आगामी 'मैसा' चित्रपटामुळे चर्चेत आहे. मात्र, चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान झालेल्या गंभीर दुखापतीमुळे ती काही दिवसांपासून विश्रांती घेत आहे.

या अपघातानंतर आता रश्मिकाने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करत तिच्या प्रकृतीबाबत माहिती दिली आहे. दुखापत नेमकी कशी झाली, सध्या तिची प्रकृती कशी आहे आणि पुढील काही दिवस ती काय करणार आहे, याबाबत तिने चाहत्यांशी मनमोकळेपणाने संवाद साधला.

रश्मिकाने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर करत भावनिक पोस्ट लिहिली. ती म्हणाली, “दुखापत होणं खूप वाईट असतं. मला वाटलं होतं की कुणालाच याबद्दल कळणार नाही. पण तसं झालं नाही. त्यामुळे काही दिवस मी सोशल मीडियापासून दूर होते. आता मी पुन्हा परतले आहे.”

तिने सांगितले की, ही सलग तिसरी वेळ आहे जेव्हा शूटिंगदरम्यान तिला दुखापत झाली आहे. त्यामुळे आता स्वतःच्या शरीराकडे मशीनसारखं नाही, तर एका सामान्य माणसाच्या शरीरासारखं पाहायला शिकायला हवं, अशी जाणीव तिला झाली आहे.

दुखापतीबद्दल माहिती देताना रश्मिका म्हणाली की, कंबरेच्या दोन्ही बाजूंना असणाऱ्या टेंडन्समुळे कंबर आणि पाय यांची हालचाल होते. ‘मैसा’ चित्रपटासाठी डान्स सीक्वेन्सचे शूटिंग सुरू असताना तिच्या उजव्या कंबरेजवळील एक टेंडन दुखावला आणि तो आपल्या जागेवरून निसटला. त्यामुळे पाय उचलणे आणि चालणेही कठीण झाले.

ती म्हणाली, “हा माझ्या कारकिर्दीतील सर्वात कठीण आणि ऊर्जा लागणारा डान्स होता. त्याच वेळी ही दुखापत झाली. आता तो टेंडन पुन्हा व्यवस्थित बरा होण्यासाठी वेळ लागणार आहे.”

रश्मिकाने चाहत्यांना काळजी न करण्याचे आवाहनही केले. तिने सांगितले की, वेदना होत आहेत, पण त्या सहन करण्यासारख्या आहेत. तिच्या मते, कदाचित देवच तिला जबरदस्तीने विश्रांती घ्यायला सांगत आहे. कारण ती स्वतःहून कधीच ब्रेक घेत नाही.

या काळात ती घरी राहून विविध गोष्टी करत असल्याचेही तिने सांगितले. विशेष म्हणजे, सध्या ती पझल्स सोडवण्यात वेळ घालवत असून त्यात आपण चांगली असल्याचे तिला आता समजल्याचेही तिने मजेशीर अंदाजात लिहिले.

रश्मिकाने आणखी एक चिंता व्यक्त केली. नियमित व्यायाम आणि धावण्यामुळे ती स्वतःला फिट ठेवते. मात्र दुखापतीमुळे काही काळ ती व्यायाम करू शकणार नाही. त्यामुळे वजन वाढेल की काय, अशी भीती तिला वाटत आहे.

ती म्हणाली, “मी नेहमी वर्कआउट आणि रनिंग करते. आता काही दिवस ते शक्य होणार नाही. मग मी काय करणार? बहुतेक खाणार… आणि डेझर्टची चाहती बनणार,” असे तिने विनोदी शैलीत लिहिले.

पोस्टच्या शेवटी रश्मिकाने चाहत्यांचे प्रेम आणि पाठिंबा याबद्दल आभार मानले. “माझी काळजी करू नका. मी लवकरच पूर्णपणे बरी होईन. तुम्हा सर्वांना खूप प्रेम,” असा संदेशही तिने दिला.

रश्मिका मंदानाच्या या पोस्टनंतर चाहते तिला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देत आहेत. सोशल मीडियावर तिच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त करणाऱ्या पोस्ट्सही मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat