Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
River Pollution : नदीचे पात्र की हिरवे मैदान? कोट्यवधी खर्चूनही जलपर्णी जैसे थे; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

River Pollution : नदीचे पात्र की हिरवे मैदान? कोट्यवधी खर्चूनही जलपर्णी जैसे थे; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

प्रभात 3 months ago

River Pollution - पिंपरी चिंचवड शहरातून मुळा, पवना व इंद्रायणी या तीन नद्या वाहतात. तीनही नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर भराव टाकत पात्र अरुंद केले जात आहे. तसेच जलपर्णी काढण्यासाठी महापालिकेकडून कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात असतानाही मुळेच्या पात्रावर हिरवीगार जलपर्णी वाढली आहे.

पिंपरी चिंचवड शहरातून वाहणाऱ्या मुळा नदीमध्ये मोठ्या प्रमाणावर जलपर्णीची वाढ झाल्याने नदीचे नैसर्गिक अस्तित्व धोक्यात आले आहे. नदीच्या पात्रात ठिकठिकाणी हिरव्या जलपर्णीचे जाड थर साचले असून पाण्याचा प्रवाह मंदावला आहे. नदीतील वाढत्या प्रदूषणामुळे जलपर्णी झपाट्याने पसरत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

शहरातील सांडपाणी, औद्योगिक स्राव आणि घनकचरा थेट नदीत मिसळत असल्याने पाण्यातील पोषकद्रव्यांची पातळी वाढते. याचाच परिणाम म्हणून जलपर्णी वेगाने वाढते. जलपर्णीमुळे पाण्यातील विरघळलेल्या प्राणवायूचे प्रमाण घटते आणि मासे व इतर जलचरांच्या अस्तित्वावर परिणाम होतो. तसेच पाण्याचा प्रवाह रोखला गेल्याने डासांची उत्पत्ती वाढून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

पावसाळा सोडून आठ महिने ठेकेदारांकडून नदी पात्र स्वच्छ केले जाते. पवना नदीचे काम शुभम उद्योगकडे आहे. त्यासाठी वर्षाला २ कोटी २ लाख ३९ हजार ९४७ रुपये खर्च आहे. संबंधित ठेकेदाराची १५.५० टक्के कमी दराची निविदा आहे. तर, मुळा नदी पात्र स्वच्छतेचे काम ठेकेदार मोरया डेव्हलपर्सला देण्यात आले आहे.

त्यासाठी वर्षाला १ कोटी ९ लाख २५ हजार ८७१ रुपये खर्च आहे. संबंधित ठेकेदाराने २२.९९ टक्के कमी दर दिला आहे. हे काम एका वर्षासाठी देण्यात आले होते. त्याला नोव्हेंबर २०२५ मध्ये पुन्हा एका वर्षांची मुदतवाढ देण्यात आली. मात्र, नद्यांमधील जलपर्णी जैसे थे असल्याचे चित्र आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat