Thursday, 26 Mar, 3.05 am प्रभात

मुखपृष्ठ
रुपयाची किंमत पुन्हा घसरली

नवी दिल्ली - भारतीय रुपयाची किंमत डॉलर्सच्या तुलनेत पुन्हा घसरली असून ही किंमत 76 रुपयांचा टप्पाही ओलांडून पुढे गेली आहे. दोन दिवसांपूर्वीच रुपयाची किंमत प्रति डॉलरला 75 रुपयांपर्यंत गेली होती. त्यानंतर सोमवारी बाजार बंद होताना रुपयाची किंमत 76 रुपये 16 पैशांवर गेली.

येत्या काही काळात रुपयाची किंमत आणखी घसरून ती प्रति डॉलर 77 रुपयांवर जाण्याची शक्‍यता आहे, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांनी म्हटले आहे. एकूण जागतिक स्थिती पाहता जगातील अन्य चलनांच्या तुलनेत डॉलरची किंमत वधारत असून त्याचा भारतीय रुपयावरही विपरीत परिणाम होताना दिसत आहे.

दरम्यान, करोनामुळे उद्‌भवलेल्या एकूण आर्थिक स्थितीच्या पार्श्‍वभूमीवर रिझर्व्ह बॅंकेने बाजारातील रोकड उपलब्धता सुरळीत राहील यासाठीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. रिझर्व्ह बॅंकेनेही थेट डॉलर्सची विक्री सुरू केल्याने रुपयाची किंमत आणखी घसरणार नाही याची काळजी घेतली जात असली तरी रिझर्व्ह बॅंक किती दिवस ही उपाययोजना सुरू ठेवणार यालाही मर्यादा आहे. ही आणि भविष्यातील आर्थिक आव्हाने पेलण्याची भारताची क्षमता आहे की नाही या धास्तीने गुंतवणूकदारांनी शेअर मार्केटमधून गुंतवणूक मोठ्या प्रमाणात काढून घ्यायला सुरुवात केली आहे. त्याचाही विपरीत परिणाम रुपयाच्या किमतीवर होताना दिसत आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top