Sangli : खंडेराजुरी येथे घरफोडी करून चोरीस गेलेला सोन्या- चांदीचा दागिन्यांसह सुमारे १ लाख ३१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात मिरज ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी दीपक गणपती पाटील (वय ३४, रा.
ओमनगर, मिरज) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
खंडेराजुरी येथील फिर्यादी हरीशचंद्र बळवंत पाटील यांच्या पत्नी मंगल पाटील यांच्या घरातील कपाटातून दागिने चोरीला गेल्याची तक्रार मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात दाखल झाली होती. चोरीला गेलेल्या मुद्देमालामध्ये १२ ग्रॅम वजनाच्या दोन वाट्या मणी व इतर डिझाईन असलेले मंगळसूत्र, पाच ग्रॅम वजनाचे एक पदक व मणी असलेले सोन्याचे गंठण, चार ग्रॅम वजनाचे कानातील सोन्याचे टॉप्स, चांदीचे पैंजण आणि चांदीची माळ यांचा समावेश होता.
गुन्हा दाखल झाल्यानंतर मिरज ग्रामीण पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाने घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला. पोलिसांनी घरातील नातेवाईकांसह विविध व्यक्तींकडे चौकशी केली. या चोरीचा गुन्हा दीपक पाटील याने केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण पथकाने त्याचा शोध घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
पोलिसांनी त्याच्याकडून चोरीतील दोन वाट्या मणी- मंगळसूत्र, सोन्याचे गंठण, कानातील सोन्याचे टॉप्स, चांदीचे पैंजण आणि चांदीची माळ असा मुद्देमाल हस्तगत केला. मिरज ग्रामीण पोलिसांकडून तपास सुरू आहे.
पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलिस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मिरज विभागाचे उपअधीक्षक अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत पोलिस निरीक्षक अमितकुमार पाटील, सहायक पोलिस निरीक्षक विक्रांत संकपाळ, किरण कांबळे, हेमंत ओमासे, शशिकांत जाधव, विकास भोसले, अर्पणा जाधव, सुनंदा लोहार आणि शबाना निकम यांनी सहभाग घेतला.

